मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : राज्यात पुन्हा सत्ताबदलाच्या हालचाली, अजित पवारांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द

Ajit Pawar : राज्यात पुन्हा सत्ताबदलाच्या हालचाली, अजित पवारांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 17, 2023 02:27 PM IST

Ajit Pawar In Pune : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar In Pune
Ajit Pawar In Pune (HT_PRINT)

NCP And BJP Alliance : राष्ट्रवादी राज्यात भाजपसोबत युती करत सत्तेत सहभागी होणार असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आज पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. सासवड येथील राष्ट्रवादीचा मेळावा तसेच पुणे शहरातील कार्यक्रमांना आज अजित पवार हजर राहणार होते. त्यामुळं आता त्यांनी दुसऱ्यांदा पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द केल्यामुळं सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वी अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत सत्तास्थापनेबाबत चर्चा केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर आता अजित पवारांनी नियोजित कार्यक्रम रद्द केल्यामुळं राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यातील सासवड, पुरंदर, दिवे आणि वनपुरी येथील कार्यक्रमांना आज हजेरी लावणार होते. परंतु त्यांनी त्यापूर्वीच सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सासवडमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्याला हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी नागपुरातील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेतही अजित पवारांनी भाषण करणं टाळळं होतं. त्यामुळं आता महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे घडलं, त्यात चूक कोणाची?; राज ठाकरे म्हणाले…

अजित पवार नवे राज्याचे मुख्यमंत्री होणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेवर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टातून निकाल येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला दणका दिल्यास भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्या ३५ ते ४० आमदार भाजपसोबत युती करत सत्तेत सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आठ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत खातेवाटपावर चर्चा केल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. त्यामुळं आता येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा आणखी एक मोठा अंक पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

IPL_Entry_Point