Mumbai railway Mega Block on 10 december 2023 : रेल्वे मार्ग दुरुस्ती व अभियांत्रिकी कामासाठी मुंबईतील लोकल मार्गावर येत्या रविवारी (१० डिसेंबर) रोजी मेगा ब्लॉक असणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला वाशी दरम्यान एकही लोकल धाणार नाही. तर, ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक लोकल रद्द होणार आहेत. तर, अनेक लोकल उशीराने धावतील.
कल्याण ते ठाणे आणि कुर्ला ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही विलंबाने धावणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.३० ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर आपल्या गंतव्य स्थानी १० मिनिटे उशीराने पोहचतील. या लोकल कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील.
कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद/ स्लो लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील व आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशीराने पोहचतील.
त्याचबरोबर सीएसएमटी येथून तसेच दादरहून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणार्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सीएसएमटीकडे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मध्य व हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कुर्ला तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.