मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  SIT Inquiry : एसआयटी लावण्याची खाज असेल तर खोकेवाल्यांचीही चौकशी करा; संजय राऊतांची मागणी

SIT Inquiry : एसआयटी लावण्याची खाज असेल तर खोकेवाल्यांचीही चौकशी करा; संजय राऊतांची मागणी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 24, 2022 11:15 AM IST

Sanjay Raut PC : जे विषय पोलीस आणि सीबीआयनं संपवलेले आहेत, त्या विषयाची एसआयटीमार्फत चौकशी करून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

Sanjay Raut On Shinde Group
Sanjay Raut On Shinde Group (HT_PRINT)

Sanjay Raut On Shinde Group : दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यावरून आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत खोकेवाल्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं आता शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारकडून एसआयटीचं रेशनिंग केलं जात आहे. मागेल त्याला एसआयटी दिली जात आहे. सरकारला एसआयटी चौकशी करण्याची खाज असेल तर त्यांनी खोकेवाल्यांचीही चौकशी करायला हवी. आमदारांना ५० खोके देऊन फोडण्यात आलं तो व्यवहार काय होता?, असा सवाल करत संजय राऊतांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. जे विषय पोलीस आणि सीबीआयसाठी संपलेले आहेत, त्यावर सरकार एसआयटी लावून सत्ता आणि यंत्रणेचा गैरवापर करत आहे. सत्ताधाऱ्यांची अनेक प्रकरणं बाहेर आली असून त्याचाही तपास व्हायला हवा. एसआयटी चौकशी ही अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणात स्थापन केली जात असते. हे सरकार ऊठसूठ एसआयटी स्थापन करत असल्यानं त्यांनी पोलिसांना काही कामच ठेवलं नसल्याचा आरोप राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.

आधी विरोध करणारे आता तीच योजना आणतायंत- राऊत

शॉपिंग मॉलमधून मद्यविक्री करण्याला महाविकास आघाडी सरकारनं परवानगी दिली होती कारण तो निर्णय राज्यातील द्राक्ष उत्पादकांच्या हिताचा होता. त्याला भाजपनं विरोध केला आणि तेच लोक मद्यविक्रीचं धोरण आणत आहेत, त्यावेळी भाजप नेत्यांनी या धोरणावर कोणत्या भाषेत टीका केली होती?, मुंबईतील नाईट लाईफला विरोध करणारे आशिष शेलार आज कुठे आहेत?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

IPL_Entry_Point