
Raj Thackeray on SC Verdict : महाराष्ट्रातील सत्तांतर कायदेशीर की बेकायदेशीर या संदर्भातील खटल्यावर सर्वोच्च न्यायालयानं काल दिलेल्या निकालावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधारी व विरोधक हा निकाल आपल्याच बाजूनं लागल्याचा दावा करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर अत्यंत प्रांजळ प्रतिक्रिया दिली आहे. हा निकाल प्रचंड कन्फ्युजिंग आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केलं. 'न्यायालयाची जी भाषा असते ती अत्यंत गुंतागुंतीची असते. माझ्याविरोधात खटले सुरू असताना मला कोर्टाकडून किंवा पोलिसांकडून अनेकदा नोटीस यायची. ती नोटीस वाचून आपल्याला अटक केलीय की सोडलंय हेच कळत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
'कालच्या निकालात सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की सगळी प्रक्रिया चुकली, पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. दुसरं म्हणजे, विधीमंडळातील गट हा पक्ष समजला जाणार नाही, बाहेरचा पक्ष व संघटना हाच पक्ष असेल, असं न्यायालयानं नमूद केलंय. मग निवडणूक आयोगानं विधीमंडळ पक्षाच्या आधारे शिंदे गटाला जे चिन्ह आणि नाव दिलंय, त्याचं काय होणार?, असा सवाल राज यांनी केला.
'निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय या दोन वेगळ्या यंत्रणा आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोग काय करणार हाही प्रश्न आहे. भयंकर कन्फ्युजिंग आहे सगळं. ही सगळी धूळ खाली बसेल तेव्हा नेमकं काय झालंय ते समजेल, असं राज ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या
