मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भगतसिंग कोश्यारींविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; औरंगाबादेत मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन

भगतसिंग कोश्यारींविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; औरंगाबादेत मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 04, 2022 11:43 AM IST

Maratha Kranti Morcha : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आता मराठा क्रांती मोर्चानं आक्रमक भूमिका घेतली आहे.

Maratha Kranti Morcha Against Bhagat Singh Koshyari Controversial Statement
Maratha Kranti Morcha Against Bhagat Singh Koshyari Controversial Statement (HT)

Bhagat Singh Koshyari Controversial Statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात वादंग पेटलेलं असतानाच आता या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चानं आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्याचे सरकारमंत्री आणि भाजपचे नेते अतुल सावे यांच्या घरासमोर आज मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आंदोलन केलं आहे. यावेळी राज्यपाल कोश्यारींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चानं केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज मराठा क्रांती मोर्चानं सहकारमंत्री आणि भाजप नेते अतुल सावे यांच्या घरासमोर ढोल वाजवून आंदोलन केलं आहे. या आंदोलनात राज्यातील अनेक जिल्ह्यांचे मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक सहभागी झाले असून राज्यपालांच्या वक्तव्यावर मंत्री सावेंनी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

राज्यपालांची हकालपट्टी करा- मराठा क्रांती मोर्चा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळं आता भाजपनं त्यांची तात्काळ राज्यपालपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे.

दरम्यान भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदावरून हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली असून मुंबईतील आझाद मैदानावर भाजपविरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं आता राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपवर दबाव वाढत असल्याचं चित्र आहे.

IPL_Entry_Point