मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवरायांचा जन्म कोकणात झालाय; भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानं वादंग, राष्ट्रवादीची टीका

शिवरायांचा जन्म कोकणात झालाय; भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानं वादंग, राष्ट्रवादीची टीका

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 04, 2022 11:14 AM IST

Prasad Lad : कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Prasad Lad Controversial Statement
Prasad Lad Controversial Statement (HT)

Prasad Lad Controversial Statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वादंग पेटलेलं असतानाच आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचं वक्तव्य करत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. राष्ट्रवादीनं त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेयर करत भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यामुळं आता आमदार लाड यांच्या वक्तव्यामुळं भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली होती. संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला होता. त्यानंतर रायगडावर त्यांचं बालपण गेलं. तिथून स्वराज्या सुरुवात झाली, असं वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी केलं. त्यामुळं आता त्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीनं टीका केली आहे.

राष्ट्रवादीनं आमदार लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ शेयर करताना म्हटलं आहे की, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असं म्हणत राष्ट्रवादीनं भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, मंत्री मंगलप्रसाद लोढा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांत आमदार लाड यांची भर पडली आहे. त्यामुळं आता त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point