मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLC Election: राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर; एकनाथ खडसे यांना संधी

MLC Election: राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर; एकनाथ खडसे यांना संधी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 09, 2022 01:08 PM IST

Maharashtra Vidhan Parishad Election 2022: राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना संधी देण्यात आली आहे.

Eknath Khadse
Eknath Khadse

Eknath Khadse in MLC Election: राज्य विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात विधान परिषदेचे माजी उपसभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या नावाचा समावेश आहे. दुसऱ्या जागेवर राष्ट्रवादीनं भाजपमधून आलेले माजी मंत्री व दिग्गज नेते एकनाथ खडसे यांना संधी दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी होऊन राज्यातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० जून रोजी मतदान होणार आहे. सर्व प्रमुख पक्षांनी या निवडणुकीसाठी उमेदवार घोषित केले आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबत कुठलाही निर्णय झाला नव्हता. त्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. अखेर पक्षानं आपले पत्ते उघडले आहेत. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहून राष्ट्रवादीनं अनुभवी नेत्यांना विधीमंडळात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे हे पुन्हा विधीमंडळात दिसणार आहेत. राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या १२ उमेदवारांच्या यादीत खडसे यांच्या नावाचा समावेश होता, अशी चर्चा होती. मात्र, ही यादी महाविकास आघाडीनं नंतर बदलली होती. शिवाय, राज्यपालांनी अद्यापही या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवलेला नाही. त्यामुळं खडसे यांना बरीच प्रतीक्षा करावी लागली. या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे.

संख्याबळानुसार, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार सहज निवडून जाणार आहेत. त्यामुळं एकनाथ खडसे व रामराजे नाईक निंबाळकर यांची आमदारकी ही आता औपचारिकताच उरली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या