Maharashtra Rain: येत्या २ दिवसात जोरदार पावसाची शक्यता; पुण्यासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Rain: भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोलीत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Maharashtra Rain: राज्यात नागपूर विभागात गेल्या २४ तासात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोलीत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोलीतील १८ आणि तर भंडारा जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद केली आहे. दुसरीकडे सध्या कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती याठिकाणी मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाच्या हलक्या सरी पडत असल्यानं पुराची स्थिती नाहीय. दरम्यान, हवामान विभागाने येत्या दोन दिवसात जोरदार पावसाचा इशारा दिलाय.
ट्रेंडिंग न्यूज
मध्य भारतात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मुंबईत पाऊस दिसून आला आहे. पुण्यात घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट दिला आहे. तर विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
विदर्भात बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यामध्ये वीजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुण्ाला यलो अलर्ट दिला आहे. याशिवाय कोकणातही पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीय.
गेल्या दोन दिवसात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह उत्तर कोकणात मुसळधार पाऊस झाला. तर मंगळवारी विदर्भात पावसाचा जोर कमी झाला होता. मध्य महाराष्ट्रात मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. आता उत्तर छत्तीसगढ आणि पूर्व मध्य प्रदेशात असणारं तीव्र कमी दाबाचं क्षेत्र पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्यप्रदेशात होतं. याची तीव्रता आता कमी होत आहे. शुक्रवारी उत्तर बंगालच्या उपसागरात नव्यानं कमी दाबक्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता कमी असल्याचंही हवामान विभागाने म्हटलं आहे.