ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणावर राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला पळून जाण्यात मंत्रीदादा भुसे यांनी मदत केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता त्यांच्या सोबत अजून दोन मंत्र्यांचा समावेश असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच या दोन मंत्र्यांची नावे लवकरच पुढे आणू असा इशाराही अंधारे यांनी दिला आहे.
अंधारे म्हणाल्या की, मंत्री दादा भुसे यांचे फोन डिटेल्स तपासल्यावर सर्व सत्य बाहेर येईल मंत्रीपदावर असताना कुठल्याही प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी मंत्रीपदावरुन पायउतार झालं पाहिजे, त्यानंतरच त्यांची चौकशी केली जाऊ शकते.
ससूनमध्ये ललित पाटील याच्यावर काय उपचार सुरू होते याची माहिती सरकारने द्यावी. गृहमंत्री आम्हालाही कायदा माहिती आहे. कुठली माहिती गोपनीय आणि कुठली खुली करायची असते हे आम्हाला माहिती आहे. ललित पाटील प्रकरणाचा तपास कुठंपर्यंत आलाय हे सांगू नका. पण उपचार काय सुरू होते हे तरी सांगा.
ससून रुग्णालयातील डीन संजीव ठाकूर यांना पदावर राहण्याचा आधिकार नाही. संजीव ठाकूर यांचं निलंबन करा आणि त्यांची नार्को टेस्ट करा. त्यानंतरच या प्रकरणात अनेक मंत्र्यांची नावे समोर येतील. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करा अन्यथा या सगळ्या प्रकरणी महविकास आघाडी २४ तारखेला रस्त्यावर उतरून मोर्चा काढणार, असा इशाराही अंधारे यांनी दिला आहे.
दादा भुसे याचं नाव घेतल्यावर सगळ्यांनी आमच्यावर आरोप केले. भुसे पालकमंत्री असलेल्या नाशिकमध्ये ड्रग्जचा एवढा मोठा कारखाना उभा कसा राहिला? या प्रश्न उपस्थित करत या ड्रग्ज प्रकरणाला पालकमंत्री देखील जबाबदार आहेत. अशा बेजबाबदार पालकमंत्र्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा घणाघात त्यांनी केला.
ललित पाटीलने राज्यातील मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना पार्ट्या दिल्या. याची सगळी माहिती आम्हाला आहे. ललित पाटील अनेक दिवसांपासून ससून जवळच्या हॉटेलमध्ये राहत होता. असा आरोपही अंधारे यांनी केला आहे.