मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra Political Crisis Sharad Pawar Says Bjp Behind Shivsena Mla Rebel

Sharad Pawar: बंडामागे भाजपच; आमदारांना भोगावे लागतील ‘हे’ परिणाम…

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)
Suraj Sadashiv Yadav • HT Marathi
Jun 23, 2022 10:25 PM IST

अजित पवार यांनी या बंडामागे अजुनतरी भाजप असल्याचं दिसत नाही असं म्हटलं होतं. मात्र शरद पवार यांनी अजित पवार यांच्या अगदी उलट प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील सरकार धोक्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा सोडले. यानंतर आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. शिवसेनेचे आणखी काही आमदार गुवाहाटीला गेले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) मुंबईत बैठक झाली. या बैठकीआधी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा अजित पवार यांनी या बंडामागे अजुनतरी भाजप असल्याचं दिसत नाही असं म्हटलं होतं. अजित पवार यांच्या उत्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की,"अजित पवारांनी महाराष्ट्रातली आणि मुंबईतली स्थिती पाहून असं म्हटलं असावं. मुंबईत, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि सहकारी दिसतात. अजित पवारांना ही माहिती जरूर आहे. पण गुजरात आणि आसाम इथली परिस्थिती आम्हाला माहिती आहे." एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशी मतदानानंतर काही आमदारांसह गुजरातला सुरतमध्ये गेले होते. तिथे एक दिवस राहिल्यानतंर पुन्हा आमदारासह ते आसामला गुवाहाटीत गेले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा मुक्काम गुवाहाटीत आहे.

"मी एकनाथ शिंदे यांची मुलाखत पाहिली. त्यातलं स्टेटमेंट केलंय की 'आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे.' माझ्याकडे देशातल्या सगळ्या पक्षांची यादी आहे. देशात राष्ट्रीय पक्ष सहा आहेत. भाजप, मायावतींचा बसपा, कम्युनिस्ट पार्टी, सीपीआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आहेत. आता तुम्हीच पाहा यातला कुणाचा हात आहे? आणि असेल?", असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला.

"आसामला जी व्यवस्था करणारे लोक आम्हाला दिसले ते अजित पवारांच्या परिचयाचे नाहीत पण माझ्या परिचयाचे आहेत. मला माहिती आहेत ते कोण आहेत. सुरतमध्ये सीआर पाटील हे मराठी आहेत. हे गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. आसाममध्ये सर्व व्यवस्था करण्याचं कारण म्हणजे तिथे भाजपच्या हातात राज्य आहे. त्यामुळे वस्तुस्थिती स्पष्ट होते." असं म्हणत यामागे भाजपचाच हात असल्याचं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

संबंधित बातम्या