पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत ही ३१ मार्च २०२४ होती. त्यामध्ये आता १५ दिवसांची वाढ करून १५ एप्रिल २०२४ करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी आवश्यक एसईबीसी प्रमाणपत्र (SEBC Certificate) मिळण्यास वेळ लागत असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
गृह विभागाकडून १७ हजार ७०० रिक्त पदावर भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या भरतीसाठी ५ मार्च २०१४ पासून ऑनलाईन अर्ज केले जात आहेत. याआधी ही मुदत ३१ मार्च होती आता हीच मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
सरकारकडून नव्याने मंजूर झालेल्या मराठा आरक्षणातील SEBC प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब लागत असल्यामुळे सरकारने मुदतवाढ दिली आहे.
मृहमंत्रालयाकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आले आहे. त्या म्हटले आहे की, पोलीस भरती २०२३ मधील पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यांत येते की, दिनांक ३१.०३.२०२४ पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत Mahait यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरु आहे. त्याप्रमाणे उमेदवारांना SEBC प्रमाणपत्र मिळणेस विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवदेन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक १५.०४.२०२४ करण्यात येत आहे, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.
दरम्यान मुदतवाढीच्या अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास, अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळणेसाठी केलेल्या अर्जाच्या पोचपावतीसह अर्ज अर्ज सादर करावा. मात्र कागदपत्र पडताळणीसाठी बोलावल्यास उमेदवाराकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक असल्याचे, सरकारने म्हटले आहे.