मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dada Bhuse : भाकरी मातोश्रीची, चाकरी पवारांची... मंत्र्याच्या वक्तव्यावरून विधानसभेत राडा

Dada Bhuse : भाकरी मातोश्रीची, चाकरी पवारांची... मंत्र्याच्या वक्तव्यावरून विधानसभेत राडा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 21, 2023 04:03 PM IST

Dada Bhuse - Ajit Pawar : संजय राऊत यांच्या आरोपांवर बोलताना मंत्री दादा भुसे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळं विधानसभेत राष्ट्रवादीच्या आमदारांनी आज सरकारलं घेरलं.

Dada Bhuse - Ajit Pawar
Dada Bhuse - Ajit Pawar

Dada Bhuse - Ajit Pawar : शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांच्यावर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या घोटाळ्याच्या आरोपाचे पडसाद अधिवेशनात उमटले आहेत. राऊत यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना दादा भुसे यांनी केलेल्या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सरकारला घेरलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत भाजप व शिंदे गटाच्या आमदारांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. आज त्यांनी ट्वीट करून दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे. भुसे यांनी 'गिरणा अ‍ॅग्रो' नावानं १७६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. ‘गिरणा अग्रो’ नावानं भुसे यांनी शेतकऱ्यांकडून १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स गोळा केले. मात्र, कंपनीच्या वेबसाइटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट असून लवकरच स्फोट होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

खासदार संजय राऊत यांच्या या ट्वीटवर बोलताना दादा भुसे यांनी संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खातात आणि शरद पवाराच्या घरची चाकरी करतात, असं वक्तव्य केलं. त्यास राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार हरकत घेतली. दादा भुसे यांनी शरद पवार साहेबांचं नाव घेण्याची आवश्यकता नव्हती. तुम्ही दिलगिरी व्यक्त करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

अजित पवारांच्या दिलगिरीच्या मागणीनंतर राष्ट्रवादीचे आमदारही आक्रमक झाले. 'पन्नास खोके माजलेत बोके... पन्नास खोके, एकदम ओके… दादा भुसे मुर्दाबाद... दादा भुसे यांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय... अशा घोषणा देत राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत जोरदार आंदोलन केलं.

दादा भुसे यांनी केलेलं वक्तव्य मीडियापर्यंत गेलं आहे, त्यामुळं तुम्ही रुलिंग लवकर द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडं केली. त्यावर, मंत्री महोदयांनी शरद पवारांबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं असेल तर ते रेकॉर्डवरून काढण्यात येईल, असं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिलं. त्यानंतर गदारोळ शांत झाला.

IPL_Entry_Point