मुंबई: विधान सभेत ८ मार्च रोजी राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मोठा दावा केला होता. राज्यात तथाकथित 'लव्ह जिहाद'चे तब्बल एक लाख प्रकरणे असल्याचा त्यांनी दावा होता. त्यांच्या या व्यक्तव्यावरून राजकीय वादंग उठले होते. मात्र, लोढा यांचा दावा त्यांच्याच विभागात येणाऱ्या एका समितीच्या अध्यक्षांनी फोल ठरवला आहे. गेल्या तीन महिन्यात या अशा प्रकारची एकही तक्रार आली नसल्याची समितीच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.
राज्यात लव्ह जिहादची अनेक प्रकरणे असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला होता. मात्र, असा कुठलाच डाटा नसल्याचा दावा विरोधकांनी केला होता. दरम्यान, याच मुद्यावरून महिला आणि बालविकास मंत्रालयाने आंतरधर्मीय विवाहांच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. राज्यात होणाऱ्या आंतर-धर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची माहिती मिळवण्याची जबाबदारी ही या समितीची होती. सुरुवातीला यात आंतरजातीय जोडप्यांच्या माहिती घेतली जात होती. मात्र, हे यातून काही दिवसांनी वगळण्यात आले होते. १२ सदस्यांच्या या समितीकडे १५२ तक्रारी आल्या असल्याचा दावा महिला बाल विकास मंत्री लोढा यांनी केला होता. मात्र, समितीकडे आतापर्यंत एकही तक्रार आली नसल्याची माहिती समोर आली आहे. या बाबतची माहिती महिला आणि बाल विकास आयुक्त आर. विमला यांनी दिली आहे. ही समिती खुद्द लोढा यांच्या अध्यक्षतेखालील काम करते.
समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी १६ फेब्रुवारी रोजी महिला व बालविकास आयुक्तांकडे या संदर्भात माहिती मागणारा अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी आंतरधर्मीय समितीला मिळालेल्या एकूण तक्रारी आणि त्यांचा तपशील याची माहिती मागवली. या बाबत आयुक्त आर. विमला यांनी दिलेली प्रत देखील हिंदुस्थान टाइम्सकडे आहे.
सपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी म्हणाले, लोढा यांनी विधानसभेत दिशाभूल करणारे दावे केल्याबद्दल मंत्र्याविरुद्ध विशेषाधिकार प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, अद्याप विधिमंडळ प्रशासनाकडून याला कोणताच प्रतिसाद देण्यात आलेला नाही. लोढा यांच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्ताव विधानसभेत मंजूर न झाल्यास मंत्र्याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे याझमी म्हणाले. लव्ह जिहादचे बिनबुडाचे दावे करून एक गट महाराष्ट्राचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, जे वास्तविकतेपासून दूर आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
हिंदुत्ववादी संघटना लव्ह जिहाद विरोधात राज्यभर निदर्शने आणि रॅली काढत आहे आणि धार्मिक धर्मांतरणाच्या विरोधात कायद्याची मागणी करत आहे. एवढेच नाही तर हलाल उत्पादनांवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहनही केल्या जात आहेत. लोढा यांनी महाराष्ट्र विधानसभेत राज्यात ‘लव्ह जिहाद’ची एक लाखाहून अधिक प्रकरणे आढळली आहेत. मात्र, या संदर्भात त्यांनी कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. दरम्यान, विरोधी पक्षातील राजकीय पक्ष आणि महाराष्ट्रातील अनेक महिला आणि नागरिकांच्या गटांनी आंतरधर्मीय जोडप्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यावर टीका केली आहे.
संबंधित बातम्या