मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तगडा पोलीस बंदोबस्त; सीमाभागांत तणाव

Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तगडा पोलीस बंदोबस्त; सीमाभागांत तणाव

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 06, 2022 11:40 AM IST

Maharashtra-Karnataka Border : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील तीन शहरांवर दावा ठोकल्यानंतर सीमाभागत मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Maharashtra-Karnataka Border Dispute
Maharashtra-Karnataka Border Dispute (HT)

Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, जत आणि अक्कलकोट शहरांवर दावा ठोकला आहे. याशिवाय सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्यासाठी दहा कोटी रुपये मंजुर केले आहेत. त्यामुळं आता राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढलेल्या आहेत. कर्नाटक सरकारनं सीमाप्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतरही राज्यातील सत्ताधाऱ्यांनी भूमिका स्पष्ट न केल्यानं कॉंग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. त्यातच आता कर्नाटक सरकारनं सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळं आता सीमावाद आणखी टोकाला पोहचण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई यांनी मराठी भाषिक जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी बेळगावला जाण्याची घोषणा केली होती. परंतु कर्नाटक सरकारनं त्याला विरोध केल्यानंतर दोन्ही मंत्र्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला होता. परंतु आम्ही बेळगावला जाणारच, अशी भूमिका मंत्री शंभुराजे देसाई यांनी घेतली. त्यानंतर कर्नाटकात येऊन महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असं वक्तव्य मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलं. त्यामुळंच आता महाराष्ट्रातील मंत्र्यांना अटकाव करण्याच्या सूचना मुख्यमंत्री बोम्मई यांनी प्रशासनाला दिल्याचं समजतं. त्यादृष्टीनंच आता सीमाभागांत तब्बल ४०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

कर्नाटक सरकारनं सामंजस्याची भूमिका घ्यावी- मुख्यमंत्री शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे की, सीमाप्रश्नावर कर्नाटकातील सरकारनं सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. कोणत्याही व्यक्तीला देशाच्या कोणत्याही भागात जाण्यापासून कुणीही रोखू शकत नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळं आता सीमावादाच्य प्रश्नावरून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point