देशात एकापाठोपाठ एक वंदे भारत ट्रेन लाँच केल्या जात आहेत. सध्या विविध मार्गावर ८२ वंदे भारत ट्रेन धावत आहेत. यात दिवसेंदिवस भर पडत आहेत. आता गजानन महाराजांच्या भक्तांसाठी भारतीय रेल्वेने खुशखबर दिली आहे. मुंबई व पुण्याहून तीर्थक्षेत्र शेगावचा प्रवास सुखकर आणि जलद होणार आहे. लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव मार्गावर दोन वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत.
या दोन मार्गावर वंदे भारत सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेकडून प्रस्ताव मागवण्यात आला आहे. विदर्भातील पंढरी म्हणून श्रीक्षेत्र शेगावची ओळख आहे. दररोज हजारोंच्या संख्येने भाविक शेगावला जाऊन गजानन महाराजांच्या चरणांचं दर्शन घेत असतात. मात्र शेगावला जाण्यासाठी रेल्वेसह अन्य वाहनांच्या अभावामुळे प्रवास करताना भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
मुंबई व पुण्यावरून शेगावला वंदे भारत सुरू करण्याची मागणी होत होती. ही बाब लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने शेगावसाठी दोन वंदे भारत टेन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगावसाठी वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत.
रेल्वेकडून सांगण्यात आले की, मे २०२४ पर्यंत देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या ३० ते ३५ वंदे भारत एक्सप्रेस लाँच केल्या जाणार आहेत. यामध्ये गजानन महाराज यांचे श्रीक्षेत्र शेगावचा देखील समावेश करण्यात आला आहे.
पुणे व मुंबईहून शेगावकडे धावणाऱ्या रेल्वे मार्गावर जळगाव व भुसावळ ही महत्त्वाची जंक्शन स्थानके आहेत. या स्थानकांवरुनही शेगावकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या स्थानकांवर ‘वंदे भारत ट्रेन’ला थांबा मिळू शकतो.
संबंधित बातम्या