Vande Bharat: भारतीय रेल्वेने मागील काही वर्षापासून वंदे भारत एक्सप्रेसवर खूप फोकस करत आहे. एकापाठोपाठ एक नव्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन लाँचिंग केल्या जात आहेत. आता भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. देशातील आणखी एका मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन कर्नाटक राज्यातील बेळगाव ते महाराष्ट्रातील पुणे दरम्यान धावेल. यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. राज्यसभा खासदार व भाजप नेते इरन्ना कडाडी यांनी ही माहिती दिली.
नव्या रूटवर सुरू करण्यात येणाऱ्या वंदे भारत ट्रेनबाबत रेल्वे मंत्री अश्मिनी वैष्णव यांनी कडाडी यांना पत्र पाठवून रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाबाबत माहिती दिली. दरम्यान बेळगाव ते पुणे दरम्यान वंदे भारत कधीपासून सुरू होणार, याची तारीख जाहीर झालेली नाही. ही ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशी कमी वेळेत आपल्या गंतव्य स्थानी पोहोचतील. त्याचबरोबर व्यापार व पर्यटनासही चालना मिळेल. मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान मोदींनी एकाच दिवशी पाच वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला होता. अयोध्येतून सुरू केलेल्या या रेल्वे विविध मार्गावर धावत आहेत.
देशात सध्या धावत आहेत ८२ वंदे भारत ट्रेन -
यापूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सांगितले की, वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची संख्या वाढवून ८२ करण्यात आली आहे. त्याचबरोबर नवी दिल्ली-मुंबई तसेच नवी दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावर या ट्रेनची गती ताशी १६० किलोमीटर करण्याबाबत काम सुरू आहे. त्यांनी वंदे भारत ट्रेनच्या सेवांबाबत १० खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. वैष्णव यांनी सांगितले की, ३१ जानेवारी २०२४ पर्यंत देशात ८२ वंदे भारत ट्रेन संचालित केल्या जात आहेत. त्याचबरोबर रेल्वे गाड्यांचे थांबे व वंदे भारत सह अन्य नव्या ट्रेन सेवा सतत चालणारी प्रक्रिया आहे.
संबंधित बातम्या