मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahatma Phule : महात्मा फुले यांच्या जयंतीचं पुण्यात अनोखं सेलिब्रेशन; ५ हजार किलो मिसळ बनवून वाटप

Mahatma Phule : महात्मा फुले यांच्या जयंतीचं पुण्यात अनोखं सेलिब्रेशन; ५ हजार किलो मिसळ बनवून वाटप

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 11, 2023 12:20 PM IST

Mahatma Phule Jayanti Celebration with Misal : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी तब्बल पाच हजार किलो मिसळ तयार करत त्याचे मोफत वाटप केले.

 महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त तयार केली तब्बल ५ हजार किलोची मिसळ
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त तयार केली तब्बल ५ हजार किलोची मिसळ

Vishnu Manohar on Mahatma Phule Jayanti : स्वातंत्र्यपूर्व काळात महापुरुषांनी लोकसहभागातून मोठी क्रांती केली. त्याचाच आदर्श घेत भारतातील महापुरुषांपैकी एक असलेले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून पुण्यात ५ हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ तयार केली.

ट्रेंडिंग न्यूज

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी पहाटे ३ पासून मिसळ करण्याकरिता तयारी सुरु झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी ६ वाजता भव्य अशा कढई मध्ये सर्व पदार्थ व मसाले घालून ज्योत पेटविण्यात आली. त्यानंतर सकाळी ७ वाजता संपूर्ण मिसळ तयार झाली. महात्मा फुले वाडा येथे अभिवादना करीता आलेल्या सर्व नागरिकांना मिसळ वाटप करण्यात आले.

उपक्रमामध्ये ५ हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी ५०० किलो, कांदा ३०० किलो, आलं १०० किलो, लसूण १०० किलो, तेल ३५० किलो, मिसळ मसाला १३० किलो, लाल मिरची पावडर २५ किलो, हळद पावडर २५ किलो, मीठ २० किलो, खोबरा कीस ७० किलो, तमाल पत्र ५ किलो, फरसाण १२०० किलो, पाणी ४००० लिटर, कोथिंबीर ५० जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात आले.

उपक्रमाकरिता रवि चौधरी, प्रल्हाद गवळी, श्रीधर चव्हाण, सारंग सराफ, बाळासाहेब अमराळे, विलास कसबे, विजय कुंभार, अजय पाटील, तेजस माने, नंदा पंडीत, चेतन धोत्रे, प्रितेश गवळी, संतोष पंडीत, महेंद्र मारणे, संदेश काथवटे यांसह राजकीय नेते, पदाधिकारी, सामाजिक संस्था व गणेशॊत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी देखील ५ हजार किलो मिसळ तयार होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्याकरिता दिनांक १४ एप्रिलला सकाळी ७ पासून पुणे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ५ हजार किलो मिसळ तयार करण्यात येणार आहे. तसेच तेथे अभिवादनाकरिता येणाऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग