नारायणगांव : पुणे आणि आजू बाजूच्या जिल्ह्यात टोमॅटोसाठी प्रसिद्ध असलेल्या नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोला निच्चांकी बाजार भाव मिळाला. टोमॅटोला किलोमागे केवळ १ रुपये भाव मिळाला तर २० किलोच्या क्रेटला केवळ २० ते ४० रुपये भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हजारो क्रेट टोमॅटो बाजार समिती आवारात फेकून दिला. यामुळे बाजार समितीच्या आवारात लाल चिखल पाहायला मिळाला.
पुणे जिल्ह्यात नारायणगाव उपबाजार हा टोमॅटोसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, बुधवारी केंद्रात बुधवारी शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रीसाठी आणला होता. मात्र टोमॅटोच्या प्रतवारीनुसार व्यापाऱ्यांनी केवळ २० किलोच्या एका क्रेटला फक्तक २० ते ४० रुपये बाजारभाव सांगितला. यामुळे बाजार समितीत मोठा गोंधळ झाला. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजार समितीच्या आवारात फेकून दिला.
सकाळी बाजार सुरू झाल्यावर टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेटला ६० ते १५० रुपये भाव सुरू होता. मात्र, दुपारी २० ते ४० रुपये दराने टोमॅटोची खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप करून मुजोर व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी करत त्यांनी टोमॅटो फेकून दिला. यावेळी बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, भास्कर गाडगे, संतोष चव्हाण, प्रियंका शेळके, माजी सभापती रघुनाथ लेंडे ,संतोष खैरे, बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे, चेतन रुकारी, उपसचिव शरद धोंगडे यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली.
तसेच कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सध्या टोमॅटोची अवाक वाढली असून बाजार समितीत सूचनांचे पालन न करणाऱ्या व्यापऱ्यांचे थेट परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा बाजार समितीचे उपसचिव शरद धोंगडे यांनी दिला आहे.