पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकालाची प्रतीक्षा संपली आहे. हा निकाल आज दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये १२ वीची परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल कधी लागणार या बाबत विद्यार्थी आणि पालक वर्ग प्रतिक्षेत होता. दरम्यान, बोर्डाने या बाबत काल घोषणा केली होती. त्यानुसार आज गुरुवारी दुपारी २ वाजता हा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. खालील अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
१. mahresult.nic.in
२. https://hsc.mahresults.org.in
३. http://hscresult.mkcl.org
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होणार आहे. निकालाच्या प्रतीची प्रिंट आउट विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्याल्यांना एकत्रित निकाल देखील उपलब्ध होणार आहे.
ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ( http://verification.mh- hsc.ac.in) स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार, दिनांक २६/०५/२०२३ ते सोमवार, दिनांक ०५/०६/२०२३ पर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार, दिनांक २६/०५/२०२३ ते बुधवार, दिनांक १४/०६/२०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/ UPI / Net Banking) याद्वारे भरता येईल.
फेब्रुवारी-मार्च २०२३ उच्च माध्यमिक परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल तर बोर्डाकडे संपर्क करावा.
संबंधित बातम्या