मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Andheri East Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप माघार घेणार?; आज अंतिम निर्णय

Andheri East Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप माघार घेणार?; आज अंतिम निर्णय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 17, 2022 11:42 AM IST

Andheri East Bypoll 2022 : अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसे आणि राष्ट्रवादीकडून आवाहन करण्यात आल्यानंतर आता आज दुपारी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे.

Andheri Bypoll 2022
Andheri Bypoll 2022 (PTI)

Andheri East Bypoll 2022 : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. काल रात्री फडणवीसांनी याबाबत भाजपच्या जेष्ठ नेत्यांशी चर्चा केली असून त्यात भाजपचे बहुतांश नेते निवडणुकीतून माघार घेण्याच्या तयारीत नसल्याचं समजतं. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करणार आहे. त्यामुळं आता भाजप उमेदवार कायम ठेवणार की माघार घेणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज ठाकरे आणि शरद पवारांनी केलेल्या आवाहनानंतर त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, अंधेरी पोटनिवडणुकीच्या शेवटच्या क्षणी काही निर्णय घ्यायचा असेल तर तो मला एकट्याला घेता येणार नाही, त्याला मला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल. याशिवाय 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलावं लागेल, असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात आज दुपारी बैठक होणार आहे.

आज अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राज ठाकरे आणि शरद पवारांनी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केल्यानंतर त्याबाबत फडणवीसांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय निर्णय होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

शिवसेना-भाजप आमनेसामने येणार?

अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक ही मुंबई महापालिका निवडणुकांची लिटमस टेस्ट मानली जात आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बंडखोर शिंदे गट आणि ठाकरेंची शिवसेना पहिल्यांदाच आमने-सामने येतील. पक्षात बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना वाढता पाठिंबा पाहता भाजप या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

IPL_Entry_Point