ठाणे-बेलापूर मार्गावर तुफान वाहतूक कोंडी, चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, प्रवासी अडकले!
Traffic Jam On Thane-Belapur Route : गेल्या तासाभरापासून महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्यामुळं प्रवासी अडकून पडले आहेत.
Traffic Jam On Thane-Belapur Route : पहाटेपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत होत असलेल्या रिमझिम पावसामुळं मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ठाण्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही झाला आहे. कारण आता ठाणे-बेलापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे. मुकुंद कंपनी येथील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळं मुकुंद कंपनी ते कळवा पूल या दरम्यान चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळं नवी मुंबईच्या दिशेनं निघालेल्या कर्मचारी आणि प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. गेल्या तासाभरापासून मोठ्या संख्येनं वाहनं ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्यामुळं प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
ट्रेंडिंग न्यूज
ठाणे-बेलापूर मार्गावरून दररोज हजारोंच्या संख्येनं वाहनं नवी मुंबईच्या दिशेनं येत असतात. परंतु आज सकाळपासून मुंबईसह उपनगरांच्या भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळं अनेकांनी चारचाकी वाहनांतून प्रवास करण्यास पसंती दिली. याशिवाय मुकुंद कंपनीसमोरील पुलाखाली पाणी साचल्यामुळं त्याचा विपरित परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला. पुलाखालून जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावल्यामुळं तब्बल चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळं वेळेवर कामासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. त्यानंतर आता वाहतूक पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाची दखल घेत वाहनांना वाट मोकळी करून देण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाल्यामुळं शेतीपिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यानंतर आता मुंबईसह कोकणातही अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळं सामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.