मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain : हिवाळ्यात अवकाळी पावसानं झोडपलं; मराठवाडा, विदर्भासह कोकणात संततधार

Maharashtra Rain : हिवाळ्यात अवकाळी पावसानं झोडपलं; मराठवाडा, विदर्भासह कोकणात संततधार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 15, 2022 08:58 AM IST

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रात्री अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांसह वीटभट्टी व्यावसायिकांच्या चिंता वाढल्या आहेत.

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update (HT)

Maharashtra Weather Update : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढलेला असतानाच आता मध्यरात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस झाल्यानं रब्बी पिकांसह फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं अचानक आलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यामुळं गेल्या वर्षीचा खरीप हंगाम वाया गेल्यामुळं यंदाचा रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तामिळनाडूतील मंदोस चंक्रिवादळामुळं राज्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री पावसानं हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील औरंगाबादसह इतत सातही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव आणि नाशिकमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. याशिवाय विदर्भातही अवकाळी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

वीटभट्टी व्यावसायिक चिंतेत...

पावसाळा संपला की अनेक वीटभट्टी व्यावसायिक नवीन भट्ट्या टाकतात. उन्हाळा आणि हिवाळा हा या व्यवसायासाठी फार महत्त्वाचा असतो. परंतु भट्टीतील वीटा विक्रीसाठी तयार असतानाच अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळं वीटा पुन्हा मऊ होत असल्यामुळं वीटभट्टीचालकांना लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागत आहे.

शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान...

राज्यातील अवकाळी पावसामुळं अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या कापूस, केळी, मिरची आणि रब्बी हंगामातील इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ढगाळ वातावरण आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळं ज्वारी, तूर आणि हरभऱ्याच्या पिकांना आळी आणि घातक किटकांचा धोका निर्माण झाला आहे.

कोकणातही अवकाळी पावसाची हजेरी...

तामिळनाडूतील मंदोस या चक्रिवादळामुळं वातावरणात बदल होऊन मराठवाड्यासह विदर्भ आणि कोकणात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानंतर मध्यरात्री कोकणातील रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये वीजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

IPL_Entry_Point