मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Worli Bandh : महापुरुषांच्या अपमानाविरोधात आज वरळीत बंदची हाक; आदित्य ठाकरेही आंदोलनात होणार सहभागी?

Worli Bandh : महापुरुषांच्या अपमानाविरोधात आज वरळीत बंदची हाक; आदित्य ठाकरेही आंदोलनात होणार सहभागी?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 15, 2022 08:07 AM IST

Mumbai Worli Bandh : वरळीतील आंबेडकरवादी संघटनांनी आज बंद पुकारण्यात आला असून लोकांना दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे. याशिवाय या आंदोलनात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेही हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Mumbai Worli Bandh 15 December
Mumbai Worli Bandh 15 December (HT)

Mumbai Worli Bandh 15 December : महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत सातत्यानं होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात औरंगाबाद, पुणे आणि सोलापुरनंतर मुंबईच्या वरळीतही बंदची हाक देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत झालेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज वरळीत सर्व दुकानं बंद ठेवून आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. या आंदोलनाचे वरळीत ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले असून लोकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे.

वरळीतील आंबेडकरवादी संघटनांसह अन्य पुरोगामी संघटनांनी एकत्र येत हा बंद पुकारला आहे. महापुरुषांच्या अपमानाविरोधात १७ डिसेंबरला महाविकास आघाडीकडून मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. त्यापूर्वीच आज वरळीत शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आंदोलन केलं जाणार आहे. आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळं या बंदला शिवसेना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. याशिवाय आदित्य ठाकरेही आज बंदमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबाद आणि पुण्यानंतर आता सोलापुरातही उद्या शिवरायांच्या अपमानाविरोधात बंद पुकारण्यात आला आहे. त्यानंतर आता मुंबईतील वरळीत आज शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे. त्यामुळं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel