मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बळीराजावर अस्मानी संकट.. घडांनी लगडलेली द्राक्षबाग जमीनदोस्त, शेतकऱ्याला १० लाखांचा फटका!

बळीराजावर अस्मानी संकट.. घडांनी लगडलेली द्राक्षबाग जमीनदोस्त, शेतकऱ्याला १० लाखांचा फटका!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 07, 2023 07:49 PM IST

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुकाद्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र,येथील शेतकऱ्यांनासध्या अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे.

शेतकरी विलास धोंडीराम शिंदे व कोसळलेली द्राक्षबाग
शेतकरी विलास धोंडीराम शिंदे व कोसळलेली द्राक्षबाग

सांगली -  राज्यातील शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ठ संपण्यांची चिन्हे नाहीत. कांदा उत्पादन शेतकरी दर पडल्यामुळे हवालदिल झाला असून आता गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले आहेत. शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. त्यातच फळबागायतदारांची अवस्था आणखी बिकट आहे. नैसर्गिक आपत्तीतून सुटल्यानंतर शेतकऱ्यांना सुलतानी म्हणजे सरकारी धोरण व व्यापाऱ्यांकडून फटका बसतो. आता सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची द्राक्षांची बाग वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली. यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, येथील शेतकऱ्यांना सध्या अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. चिंचणी येथे वाऱ्यामुळे विलास धोंडीराम शिंदे या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेची तार तुटून एक एकर बाग कोसळली. त्यामुळे त्यांचा जवळपास १० लाखांचे नुकसान झाले आहे.

विलास शिंदे यांनी तासगाव तालुक्यातील चिंचणी गावाशेजारी माणिक चमन जातीच्या द्राक्षबागेची एक एकरात लागवड केली होती. वातावरण खराब असतानाही त्यांनी यंदा चांगल्या प्रतीची द्राक्षे तयार केली होती. माल तयार होता व व्यापाऱ्याकडे याचा सौदाही झाला होता. १३० रुपये पेटी या दराने व्यापार्‍याने बाग ठरविली होती व दोन दिवसात हा माल काढण्यास सुरुवात होणार होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुटलेल्या वाऱ्यामुळे बाग द्राक्षांचे वजन पेलू शकली नाही व खांबांसह कोलमडून पडली. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. 

सध्या द्राक्षांचा हंगाम सुरू आहे. मात्र, द्राक्ष उत्पादकांना चांगला दर मिळत नाही. त्यातच वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याने आर्थिक मदतीची मागणी सरकारकडे केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग