मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dudh Sangh Jalgoan : दूध संघाच्या निवडणुकीवरून खडसे-महाजन भिडले; मतदानावेळीच राजकारण तापलं

Dudh Sangh Jalgoan : दूध संघाच्या निवडणुकीवरून खडसे-महाजन भिडले; मतदानावेळीच राजकारण तापलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 10, 2022 09:32 AM IST

Jalgoan Dudh Sangh Election : जळगावातील दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीष महाजन यांच्यात राजकीय वादंग पेटलं आहे.

Jalgoan Dudh Sangh Election 2022
Jalgoan Dudh Sangh Election 2022 (HT)

Jalgoan Dudh Sangh Election 2022 : दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज जळगावात मतदान होत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीष महाजन या दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. मतदानापूर्वी एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटील आणि गिरीष महाजन यांना खोक्यांच्या मुद्द्यावरून डिचवल्यानं जळगावात ऐन मतदानावेळीच राजकीय वादंग पेटलं आहे. त्यामुळं आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

खडसेंनी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांना खोक्यांवरून डिचवल्यानंतर त्यांना उत्तर देताना मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, दूध संघात गेल्या सात वर्षांपासून तूप आणि लोणी कुणी खाल्लं हे सर्वांना माहिती आहे. खोक्यांचे आरोप दुसऱ्यांवर करताना आपण काय केलं आहे, याचंही आत्मपरिक्षण खडसेंनी करण्याची गरज असल्याचा पलटवार गिरीष महाजन यांनी केला आहे. एकनाथ खडसेंचे काही समर्थक कार्यकर्ते जेलमध्ये असून लोकही यांना कंटाळलेले आहेत. त्यामुळं आता खडसेंना पराभव समोर दिसत असल्यानंच ते आरोप करत असल्याचंही महाजन म्हणाले.

गैरव्यवहाराचे व्हिडिओ आहेत; भाजप आमदाराचा खडसेंना टोला

जळगाव जिल्हा दूध संघात कर्मचाऱ्यांची भरती करताना अनेक लोकांनी गैरव्यवहार केला आहे. त्याचे काही व्हिडिओही आपल्याकडे असल्याचा दावा चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी लोकांसमोर आणायला हवं, असं म्हणत एकनाथ खडसेंनी आमदार चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान आज सकाळपासून जळगावातील दूध संघाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी चांगलाच जोर लावला आहे. याशिवाय सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही भाजपविरोधात जिल्ह्यात जोरदार रान पेटवलेलं आहे. त्यामुळं आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

IPL_Entry_Point