Devendra Fadnavis In Vidhan Sabha : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळाच्या आवारात राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेप घेत शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर सरकारची बाजू मांडताना सत्ताधारी आमदारांना तंबी देतानाच काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
आमदारांनी घातलेल्या गोंधळानंतर सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांनी सावकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करायलाच हवा, परंतु विधीमंडळाच्या आवारात एखाद्या नेत्याच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करणं काही योग्य नाहीये. सभागृह किंवा विधीमंडळाचा आवार अशा गोष्टींसाठी नाहीये, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना फटकारलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोडे मारो आंदोलनाबाबत भूमिका मांडली ती योग्य म्हणावी लागेल. विधीमंडळाच्या परिसरात कोणत्याही आमदारांनी जोडे मारो आंदोलन करू नये. अशा प्रकारच्या आंदोलनापूर्वी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूच्या लोकांनी काळजी घ्यायला हवी, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शहीद भगतसिंग यांनी सावरकर यांचं आत्मचरित्र तयार करून ते वाटण्याचं काम केलं होतं. ही बाब इतिहासात नमूद करण्यात आलेली आहे. त्यामुळं हे (राहुल गांधी) कोण आलेत?, हे भगतसिंग यांच्यापेक्षा मोठे आहेत का?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यासह सभागृहातील काँग्रेसच्या आमदारांवर टीका केली आहे. सावरकरांनी देशासाठी जे काही भोगलंय ते दुसऱ्या कुणीही भोगलेलं नाहीये. अंदमानच्या कारागृहात असताना त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले होते. त्यांनी तब्बल ११ वर्ष अत्याचार सहन केला. इंग्रजांकडून अत्याचार होत असताना त्यांचे काही सहकारी मृत्यूमुखी पडले तर काही वेडे झाले, परंतु सावरकर मात्र 'भारत माता की जय' असा जयघोष करत होते, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.