मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विधानसभेच्या अध्यक्षांना धमकावणं खपवून घेणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं

विधानसभेच्या अध्यक्षांना धमकावणं खपवून घेणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 27, 2023 01:17 PM IST

Devendra Fadnavis : सर्वांना पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडण्याचा अधिकार आहे, परंतु तो आम्हाला मांडू दिला जात नसल्याचा आरोप करत फडणवीसांनी आमदार भास्कर जाधवांना चांगलंच धारेवर धरलं.

Devendra Fadnavis vs Bhaskar Jadhav
Devendra Fadnavis vs Bhaskar Jadhav (HT)

Devendra Fadnavis vs Bhaskar Jadhav : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानंतर विधीमंडळाच्या कामकाजास सुरुवात झाली. परंतु अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार राजकीय कलगीतुरा पाहायला मिळाला आहे. माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू दिला जात नाही आणि भास्कर जाधव हे विधानसभेच्या अध्यक्षांना धमकावत असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानंतर विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू दिला जात नसल्याचा आरोप केला. त्यावेळी ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्यासह अन्य आमदारांना फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भास्कर जाधव हे विधानसभेच्या अध्यक्षांना कसं का धमकावू शकतात?, विधानसभेच्या अध्यक्षांना धमकावण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे का?, सभागृहात बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु अध्यक्षांनाच धमकावलं जात असेल तर हे आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधव यांना चांगलंच सुनावलं. त्यानंतर सभागृहाचं पुढील कामकाज सुरळीत सुरू झालं.

विधीमंडळाचं आजचं कामकाज संपलं...

विधानपरिषद आणि विधानसभेत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाल्यानंतर काही वेळ कामकाज सुरू राहिलं. त्यानंतर साडेबारा वाजता दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे. त्यामुळं आता उद्या दुपारी बारा वाजेपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुढील कामकाजाला सुरुवात होणार आहे.

IPL_Entry_Point