satyajeet tambe news today : नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसनं विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करूनही त्यांनी अर्ज न भरल्यामुळं त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. याशिवाय काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी करणाऱ्या सत्यजीत तांबेंना तातडीनं पक्षातून निलंबित करण्याचे आदेश काँग्रेसच्या हायकमांडनं महाराष्ट्र काँग्रेस कमिटीला दिले आहेत. त्यामुळं आता तांबे कुटुंबियांसह काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या अचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीआधीच आमदार सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांनी घेतलेल्या भूमिकांमुळं काँग्रेस पक्ष आणि बाळासाहेब थोरात यांची चांगलीच गोची झाली आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची केंद्रीय पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून पक्षश्रेष्ठींनी सत्यजीत तांबे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीकडून तातडीनं सत्यजीत तांबे यांना निलंबित केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु आता नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या राजकीय घडामोडींविषयी सत्यजीत तांबे १८ जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
मविआच्या उमेदवार नॉट रिचेबल..
नाशिक पदवीधर निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक असतानाच आता महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील या सकाळपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आल्यामुळं राज्यात खळबळ उडाली आहे. भाजप नेते गिरीष महाजन हे सत्यजीत तांबेंना बिनविरोध निवडून आणण्यासाठी कालपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळं आता शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
संबंधित बातम्या