मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shubhangi Patil: मविआचा उमेदवार नॉट रिचेबल झाल्यानंतर मंत्री गिरीष महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Shubhangi Patil: मविआचा उमेदवार नॉट रिचेबल झाल्यानंतर मंत्री गिरीष महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 16, 2023 02:52 PM IST

girish mahajan on shubhangi patil : नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्यासाठी काही तास उरलेले असतानाच मविआ पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर येत आहे.

girish mahajan on shubhangi patil
girish mahajan on shubhangi patil (HT)

shubhangi patil vs satyajeet tambe in nashik graduate election : नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठी काही तासांचा कालावधी उरलेला असतानाच आता महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतल्यानंतर शुभांगी पाटील या नाशिकमध्ये परतल्या होत्या. त्यानंतर आता फोनच लागत नसल्यामुळं महाविकास आघाडीची अडचण वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या सत्यजीत तांबेंना निवडून आणण्यासाठी भाजपनं मंत्री गिरीष महाजनांना नाशिकमध्ये पाठवलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून असलेल्या गिरीष महाजन यांनी शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, नाशिक पदवीधर निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठी काही तासांचा कालावधी उरलेला आहे. त्यामुळं कोणत्या पक्षाचा उमेदवार कुठे जातो, कुठे राहतो आणि काय करतो?, याबद्दल मला काहीही माहिती नाही. शुभांगी पाटील यांच्याशी संपर्क न होणं ही खळबळजनक बातमी आहे. परंतु यात खळबळजनक असं काहीही नाहीये. असं म्हणत गिरीष महाजनांनी प्रकरणात भाजपचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आमचा शुभांगी पाटील यांच्याशी संपर्क झालेला नाही. आम्ही तसा प्रयत्नही केलेला नाही. परंतु निवडणूक लढवावी की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी भाजपनं अद्याप कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. आमचे पक्षश्रेष्ठी दुपारी तीन वाजेपर्यंत योग्य तो निर्णय घेतील, असंही गिरीष महाजन म्हणाले. शुभांगी पाटील या भाजपच्या कार्यकर्त्या कधीच नव्हत्या. त्यांनी आग्रह केला म्हणून त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला होता. त्यांना भाजपकडून तिकीटाचं आश्वासनही देण्यात आलेलं नव्हतं. परंतु आता निवडणूक लढणं किंवा न लढणं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न असल्याचं गिरीष महाजन म्हणालेत.

IPL_Entry_Point