मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती; समृध्दी महामार्गाच्या पाहणीवेळी एकीचं दर्शन

मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती; समृध्दी महामार्गाच्या पाहणीवेळी एकीचं दर्शन

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 04, 2022 02:58 PM IST

samruddhi mahamarg : येत्या ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महामार्गाची पाहणी केली आहे.

CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis On mumbai-nagpur samruddhi mahamarg expressway
CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis On mumbai-nagpur samruddhi mahamarg expressway (HT)

mumbai-nagpur samruddhi mahamarg expressway : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली आहे. येत्या ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या (नागपूर ते शिर्डी) पहिल्या टप्प्यातील मार्गाचं लोकार्पण होणार आहे. यावेळी मोदींच्या दौऱ्यातील कार्यक्रमाचाही दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला. त्यानंतर शिंदे-फडणवीसांनी समृद्धी महामार्गावर प्रवास करून कामाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं स्टेअरिंग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती असल्याचं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

समृध्दी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचं सारथ्य खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावेळी समृद्धी महामार्गाचं काम सुरू असताना एकनाथ शिंदेंनी गाडी चालवली होती आणि आता मी चालवत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणं ही फार अभिमानाची गोष्ट आहे. हे काम करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं असून त्याचा आनंद आहे.

दरम्यान नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर अंतराचं समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण झालं असून ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या महामार्गाचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्यासाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. याशिवाय नागपुरातील फेज दोन आणि तीन या मेट्रो लाईनचंही उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्यानं कार्यक्रमाला तब्बल २० हजार लोकांची गर्दी जमा होणार असल्याची माहिती आहे.

IPL_Entry_Point