मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची सुटका दहा दिवस लांबणीवर, कारण…

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची सुटका दहा दिवस लांबणीवर, कारण…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 12, 2022 12:15 PM IST

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला असला तरी त्यांची सुटका तात्काळ होणार नाही.

Anil Deshmukh
Anil Deshmukh

Stay on Anil Deshmukh Bail: भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालायनं जामीन मंजूर केला आहे. मात्र, या निर्णयास सीबीआय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्यानं देशमुख यांच्या जामिनाला उच्च न्यायालयानं १० दिवसांची स्थगिती दिली आहे. त्यामुळं देशमुख यांची सुटका लांबणीवर पडली आहे.

मनी लाँड्रिंग व भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुख हे मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून तुरुंगात आहेत. त्यांच्या विरोधात ईडीनं मनी लाँड्रिंगचा तर, सीबीआयनं भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी ईडीच्या गुन्ह्यात त्यांना आधीच जामीन मंजूर झाला आहे. तर, सीबीआयच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी सीबीआयनं वेळ मागितली आहे. त्यानुसार न्यायालयानं सीबीआयला १० दिवसांचा वेळ दिला आहे. त्यामुळं जामिनाची अंमलबजावणी आणखी दहा दिवस लांबणीवर पडणार असून तोपर्यंत अनिल देशमुख यांना आतच राहावं लागणार आहे.

माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी मुंबईतील पोलिसांना बार मालकांकडून १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप सिंग यांनी केला होता. त्या आधारे ईडी व सीबीआयनं देशमुख यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. तसंच, त्यांना अटकही करण्यात आली होती. तेव्हापासून अनिल देशमुख हे सातत्यानं जामिनासाठी प्रयत्नशील होते. त्यांना अखेर त्यात यश आलं आहे. मात्र, त्यांची सुटका होणार की नाही हे आता सर्वोच्च न्यायालयात ठरणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग