मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anil Deshmukh gets bail: मोठी बातमी! अनिल देशमुख यांना वर्षभरानंतर दिलासा, जामीन मंजूर

Anil Deshmukh gets bail: मोठी बातमी! अनिल देशमुख यांना वर्षभरानंतर दिलासा, जामीन मंजूर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 12, 2022 11:55 AM IST

Anil Deshmukh granted bail: भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे.

Anil Deshmukh
Anil Deshmukh

Anil Deshmukh granted bail: तब्बल वर्षभरापासून तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालायनं त्यांना जामीन मंजूर केला आहे. सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात हा जामीन देण्यात आला आहे.

न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकल खंडपीठानं आज हा निर्णय दिला. मागील आठवड्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठानं जामिनाचा निर्णय राखून ठेवला होता. तो आज देण्यात आला.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी उकळल्याचे आरोप केले होते. त्यानंतर देशमुख यांच्या अडचणी वाढल्या होत्या. आरोपांनंतर त्यांना गृहमंत्रिपद सोडावं लागलं. देशमुख यांच्याशी संबंधित मालमत्तांवर लागोपाठ छापे पडले. ईडी व सीबीआय अशा दोन तपास संस्थांनी त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले. सीबीआयनं देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता तर, ईडीनं मनी लाँड्रिंगच्या अनुषंगानं त्यांची चौकशी सुरू केली होती. त्यांना मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात अटक करण्यात आली होती.

ईडीच्या प्रकरणात ऑक्टोबर महिन्यातच त्यांना जामीन मिळाला होता. मात्र, सीबीआयच्या प्रकरणात विशेष न्यायालयानं त्यांचा जामीन नाकारला होता. देशमुख यांनी विशेष न्यायालयाच्या या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हानं दिलं होतं.

देशमुखांच्या वकिलांचा युक्तिवाद काय?

अनिल देशमुख यांच्या वतीनं विक्रम चौधरी व अनिकेत निकम या ज्येष्ठ वकिलांनी बाजू मांडली. देशमुख यांच्यावर दोन गुन्हे दाखल असले तरी हे प्रकरण एकच आहे. ज्याअर्थी एका प्रकरणात जामीन मंजूर केला आहे, त्या अर्थी त्याच प्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्याला काही अर्थ राहत नाही. केवळ आरोपांमुळं देशमुख यांना वर्षभराहून अधिक काळ तुरुंगात राहावं लागलं आहे. सीबीआयनं सध्या अटकेत असलेला वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे याला आपला माफीचा साक्षीदार बनवलं आहे, याकडंही वकिलांनी लक्ष वेधलं. न्यायालयानं जामिनाचा निर्णय देताना सचिन वाझे याच्या जबाबाच्या सत्यतेबद्दलही शंका उपस्थित केली.

IPL_Entry_Point

विभाग