बारामती : वीज बिल जास्त आल्याने महिला वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार; उपचारादरम्यान मृत्यू, एक वर्षाचं बाळ पोरकं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बारामती : वीज बिल जास्त आल्याने महिला वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार; उपचारादरम्यान मृत्यू, एक वर्षाचं बाळ पोरकं

बारामती : वीज बिल जास्त आल्याने महिला वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार; उपचारादरम्यान मृत्यू, एक वर्षाचं बाळ पोरकं

Apr 24, 2024 08:05 PM IST

Baramati News : वीज बिल जास्त येत असल्याची तक्रार दाखल करायला गेलेल्या तरुणाने महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने १६ वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

बारामतीत वीज बिल जास्त आल्याने महिला वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार
बारामतीत वीज बिल जास्त आल्याने महिला वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार

वीज बिल जास्त आल्याचा जाब विचारायला आलेल्या तरुणाची तक्रार घेतली नाही म्हणून संतापलेल्या तरुणाने महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने सपासप वार केले. बारामतीच्या मोरगावमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रिंकू बनसोडे (वय ३४) असे मृत महिलेचे नाव असून त्यांना एक वर्षाचे बाळ आहे.

याप्रकरणी अभिजीत पोटे आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. वीज बिल जास्त येते त्यामुळे वीज बिल तपासा अशी मागणी पोटे यांनी केली होती. मात्र वारंवार तक्रार देऊनही दखल न घेतल्याने संतापलेल्या अभिजीत पोटे याने वीज वितरण कार्यालयातील रिंकू बनसोडे यांच्यावर कोयत्याने वार केले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रिंकू गोविंदराव बनसोडे (रा. लातूर शहर) या १० वर्षापूर्वी महावितरणमध्ये नोकरीला लागल्या होत्या. सध्या त्या मोरगाव शाखेत सेवा देत होत्या. काही वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला असून  त्यांना एक वर्षाचा मुलगाही आहे. नेहमीप्रमाणे बनसोडे बुधवारी (२४ एप्रिल) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कार्यालयात काम करत होत्या. आज त्या एकट्याच कार्यालयात असताना आरोपी आला व त्याने त्यांच्यावर कोयत्याने वार केले.

अभिजीत पोटे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कार्यालयात आला. त्याने रिंकूला वीज बिल जास्त आल्याचा जाब विचारत वाद घातला. त्यानंतर संतप्त अभिजीत पोटेने सोबत आणलेल्या कोयत्याने रिंकू यांच्यावर एकापाठोपाठ १६ वार केले. रिंकू यांच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर गंभीर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रिंकू यांना तात्काळ मोरगाव येथे प्रथमोपचार करत पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रिंकू यांचा मृत्यू झाला. त्यांचे एक वर्षाचे बाळ आईविना पोरकं झालं आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून मोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याप्रकरणी वीज वितरण कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आरोपीचे वीजबिल रत्नाबाई सोपान पोटे यांच्या नावाने असून त्यांचे वीजबिल ५७० रुपये इतके आहे. मागील १२ महिन्याचा वापर  सरासरी ४० ते ७० युनीटमध्ये आहे. थकबाकी नाही. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे चालू महिन्यात विजेचा वापर ३० युनिटने वाढल्याने या महिन्याचे बिल ५७० आले होते. हे बील वापरानुसार व नवीन दरानुसार योग्यच आहे. तसेच याबाबत कोणतीही लेखी किंवा ऑनलाईन तक्रार महावितरणकडे आलेली नाही. अशी परिस्थितीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर जर हल्ले होत असतील तर आम्ही काम कसे करायचे असा सवालही या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर