मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Loudspeaker Row: राज ठाकरेंवर आजच कारवाई; पोलीस महासंचालकांचं मोठं विधान

Loudspeaker Row: राज ठाकरेंवर आजच कारवाई; पोलीस महासंचालकांचं मोठं विधान

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 03, 2022 03:32 PM IST

भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापल्याच्या पार्श्वभूमीवर गृहखात्यानं आज उच्चस्तरीय बैठक घेतली.

रजनीश सेठ
रजनीश सेठ

भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या तापलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या मनसे व भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. औरंगाबाद इथं जाहीर सभेत भोंग्यांच्या विरोधात बोलणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावरही कारवाईची चाचपणी पोलिसांकडून केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Rajnish Seth) व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रजनीश सेठ यांनी कायदा-सुव्यवस्थेची माहिती दिली. 'राज्यात वातावरण शांत आहे. अक्षय तृतीया व ईदचा सण शांततेत साजरा होत आहे, असं ते म्हणाले. 'राज्यातील वातावरण सुरळीत राखण्याची संपूर्ण तयारी पोलिसांनी केली आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये व कोणी तसा प्रयत्न केल्यास कठोर पावलं उचलण्याचे सुस्पष्ट आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत,' असं रजनीश सेठ यांनी यावेळी सांगितलं.

राज ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार उद्यापासून मनसेचे कार्यकर्ते राज्यभर मंदिरांवर भोंगे लावणार आहेत. तसंच, ठिकठिकाणी महाआरतीही होण्याची शक्यता आहे. समाजकंटकांकडून या परिस्थितीचा फायदा घेतला जाण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवरही पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. 'गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे,' असं सेठ म्हणाले. 'सामाजिक एकोपा कायम राहावा यासाठी स्थानिक पातळीवर बैठका घेण्यात आल्या आहेत. राज्यभरात एसआरपीएफच्या ८७ तुकड्या व ३० हजारांहून अधिक होम गार्ड तैनात करण्यात आले आहेत, असं सांगतानाच, 'जातीय तेढ निर्माण करण्याचा कुठलाही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही', अशी ताकीदच सेठ यांनी दिली.

राज ठाकरे यांच्यावर पोलीस नेमकी काय आणि कधी कारवाई करणार आहेत, असं पोलीस महासंचालकांना विचारण्यात आलं. त्यावर, राज ठाकरे यांच्या भाषणाचं प्रकरण औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडं आहे. ते भाषणाचा अभ्यास करत आहेत. याबाबत निर्णय घेण्यास ते सक्षम असून योग्य ती कारवाई करतील. गरज भासल्यास आजच कारवाई करतील,' असंही सेठ यांनी स्पष्ट केलं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या