मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahavitaran Strike : अनेक शहरांमध्ये मध्यरात्रीपासून लाईट नाही; तुमच्या शहराची स्थिती काय?

Mahavitaran Strike : अनेक शहरांमध्ये मध्यरात्रीपासून लाईट नाही; तुमच्या शहराची स्थिती काय?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 04, 2023 08:17 AM IST

Mahavitaran Employee Strike : खाजगीकरणाविरोधात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून तीन दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता अनेक शहरांमधील बत्तीगुल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Mahavitaran Employees Strike Against Privatization
Mahavitaran Employees Strike Against Privatization (HT)

Mahavitaran Employees Strike Against Privatization : महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या सरकारी महामंडळांचं खाजगीकरण करण्यात येऊ नये, या मागणीसाठी राज्यातील वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. त्यामुळं राज्यातील अनेक शहरांमध्ये मध्यरात्री तीन वाजेपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागांमध्येही लाईट गेल्यानं मोबाईल आणि लॅपटॉपची चार्जिंग कशी करायची?, हा प्रश्न आता लोकांसमोर उभा राहिला आहे. याशिवाय कर्मचारी संपावर गेलेले असल्यानं महावितरणनं संपकाळात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी यंत्रणा उभी केलेली असतानाही वीज गायब झाल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं आता संपाच्या पहिल्याच दिवशी अशी स्थिती असेल तर पुढील दोन दिवस लाईटविना कसे काढायचे?, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीपासून मुंबईची उपनगरं असलेल्या बदलापूर, अंबरनाथसह बेलवली, मांजर्ली, चिखलोली आणि सर्वोदयनगरमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळं लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. याशिवाय सातारा शहरासह ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून बत्तीगुल झाली आहे. मराठवाड्यातील औरंगाबादसह जालना जिल्ह्यातही ग्रामीण भागात लाईट गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता या भागांमध्ये तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शिंदे-फडणवीस सरकारनं अदानी समुहाला वीज वितरण परवाना देण्यासाठी हालचाली सुरू केल्यानंतर राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर, औरंगाबाद, मुंबई, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमधील वीज कर्मचारी संपावर गेल्यामुळं वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यानंतर आता वीज कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आंदोलनं करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.

IPL_Entry_Point