मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mohsin Shaikh Murder : पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरण, धनंजय देसाईसह २० आरोपींची निर्दोष मुक्तता

Mohsin Shaikh Murder : पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरण, धनंजय देसाईसह २० आरोपींची निर्दोष मुक्तता

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 27, 2023 03:47 PM IST

Mohsin Shaikh Murder Case : पुण्यातील हडपसर परिसरात आयटी इंजिनियर असलेल्य मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती. त्यामुळं संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली होती. परंतु आता कोर्टानं हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची सुटका केली आहे.

Mohsin Shaikh Murder Case
Mohsin Shaikh Murder Case (HT)

Mohsin Shaikh Murder Case : संपूर्ण पुण्याला हादरवून सोडणाऱ्या आयटी इंजिनियर मोहसीन शेख हत्या प्रकरणातील सर्व २० आरोपींची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. मोहसीन शेख हत्या प्रकरणात हिंदुराष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाई आणि इतर २० जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. जून २०१४ साली पुण्यातील हडपसर परिसरात मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता कोर्टानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. जून २०१४ मध्ये सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त पोस्ट शेयर करण्यात आल्यामुळं पुणे शहरातील अनेक भागांमध्ये तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावानं पीएमपीएलच्या बसगाड्या जाळल्या होता. त्यानंतर महाराजांबाबत वादग्रस्त पोस्ट शेयर केल्याच्या संशयावरून मोहसीनची आरोपींकडून हत्या करण्यात आली होती.

सोलापूर जिल्ह्याचा रहिवासी असलेला मोहसीन पुण्यात एका आयटी कंपनीत काम करत होता. दुपारी नमाज अदा करण्यासाठी तो एका मशिदीत गेला होता. नमाज पठण केल्यानंतर मशिदीबाहेर येताच सायकलीवरून आलेल्या काही आरोपींनी अचानक त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार करण्यात आल्यामुळं मारहाणीत मोहसीनचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर मोहसीनची हत्या ही हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्त्यांनी केल्याचं स्पष्ट झालं होतं.

त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहसीन शेख हत्या प्रकरणातील कायदेशीर लढाईसाठी तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. परंतु उज्ज्वल निकम यांनी या अचानक या प्रकरणात काम करणं थांबवलं होतं. त्यानंतर आता मोहसीन शेख हत्या प्रकरणातील आरोपींची मुक्तता करण्यात आल्यामुळं या प्रकरणाचा पुढील तपास कोणत्या दिशेनं जाणार, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

IPL_Entry_Point