मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hip Dysplasia: हिप डिसप्लेसिया म्हणजे काय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपचार

Hip Dysplasia: हिप डिसप्लेसिया म्हणजे काय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपचार

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 30, 2024 11:53 PM IST

Causes of Hip Dysplasia: हिप डिसप्लेसियाचा प्रामुख्याने लहान मुलांवर परिणाम होत असला तरी ही समस्या प्रौढांमध्ये सुद्धा दिसून येत आहे. हिप डिसप्लेसिया होण्याची कारणं, त्याची लक्षणे आणि उपचार जाणून घ्या.

Hip Dysplasia: हिप डिसप्लेसिया म्हणजे काय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपचार
Hip Dysplasia: हिप डिसप्लेसिया म्हणजे काय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपचार (unsplash)

Hip Dysplasia Symptoms and Treatment: आपल्या शरीरातील दैनंदिन हालचालींमध्ये खांद्याप्रमाणेच सांध्याचे महत्त्व आहे. उठणे, बसणे, चालणे यासारख्या महत्त्वाच्या क्रिया या खुब्याच्या (हिप)सांध्याशी निगडित असतात. जेव्हा हिपचा "बॉल आणि सॉकेट" योग्यरित्या तयार होत नाही. याला जन्मजात हिप डिस्लोकेशन किंवा हिप डिस्प्लेसिया असेही म्हणतात. जरी याचा प्रामुख्याने लहान मुलांवर परिणाम होत असला तरी प्रौढांमध्ये देखील ही समस्या दिसून येते. पुणे येथील जहांगीर मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचे ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट यांनी हे होण्याचे कारण, त्याची लक्षणे आणि उपचार याविषयी सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

जेव्हा पायाचे मोठे हाड हिप जॉईंट्सशी योग्यरित्या जोडलेले नसते तेव्हा हा त्रास उद्भवतो. जेव्हा हाडांमधील कार्टिलेज खराब होते तेव्हा हिप्स दुखण्याची समस्या सुरू होते. असे झाल्यास पायात अनेक वेळा तीव्र वेदना होऊ शकतात. बऱ्याच वेळा बसताना व उठताना हिप्सचे हाड वरच्या दिशेने कडक होते. ज्यामुळे हिप्सची हालचाल करताना त्रास होऊ शकतो.

ही आहेत धोक्याची लक्षणे

खुब्याच्या वेदना (प्रामुख्याने मांडीचा सांधा) चालताना किंवा शारीरीक हलचाली दरम्यान होतात. हिप डिस्प्लेसियाचे निदान झालेल्या अर्भकांमध्ये ज्यांनी अद्याप चालणे सुरू केले नाही त्यांना इतर लक्षणे दिसू शकतात. जसे की एक पाय दुसऱ्यापेक्षा जास्त बाहेरच्या दिशेने वाकलेला असणे, एका पायाची हालचाल दुसऱ्याच्या तुलनेत कमी होणे आणि त्यांच्या मांड्या आणि नितंबांभोवती सुरकुत्या पडणे.

हिप्स डिसप्लेसिया होण्याचे कारणं

हिप डिसप्लेसीया उद्भवते जेव्हा पायाचे मोठे हाड हिप जॉईंट्सशी योग्यरित्या जोडलेले नसते. हे चुकीची सांध्याची रचना, हिप सॉकेट किंवा अनियमित आकाराच्या फेमर हेडमुळे उद्भवू शकते. हे आनुवंशिक आणि जन्मजात असू शकते.

यामुळे निर्माण होणारी गुंतागुंत

यामुळे कूर्चाला जास्त झीज होऊ शकते आणि शेवटी ऑस्टियोआर्थरायटिस होऊ शकते. तसेच हाडांवर जास्त ताण येतो, ज्यामुळे एखाद्याला फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. उपचार न केलेले किंवा निदान न झालेले हिप डिस्प्लेसिया असलेल्यांना देखील स्नायूंचे असंतुलन आणि प्रभावित सांध्याभोवती कमकुवतपणा जाणवू शकतो. ज्यामुळे चालताना अडथळा येतात, गती कमी होते आणि तीव्र वेदना होतात.

निदान आणि उपचार

अल्ट्रासाऊंड, हिप एक्स-रे किंवा अगदी सीटी स्कॅन हे या स्थितीचे निदान करण्यात मदत करतात. ही स्थिती असलेल्या बाळांना योग्य नितंबाची रचना सुनिश्चित करण्यासाठी ब्रेस किंवा हार्नेस घालण्याचा सल्ला दिला जाईल. स्ट्रेचिंग आणि व्यायामासह फिजिओथेरपी ही तुमच्या हिप जॉइंटच्या आसपासचे स्नायू मजबूत करेल आणि तुमची लवचिकता सुधारेल.

शस्त्रक्रिया हा अंतिम पर्याय असतो आणि सामान्यत: हिप ऑस्टियोटॉमी आणि हिप आर्थ्रोस्कोपी यांचा समावेश होतो. ऑस्टियोटॉमी रुग्णाच्या हाडांचा आकार बदलण्यास मदत करते. हिप आर्थ्रोस्कोपी हिप जॉइंटच्या आतील भागाचे नुकसान भरुन काढण्यास आणि हालचाल करण्यास कमीत कमी आक्रमक तंत्र आहे. गंभीर हिप डिसप्लेसीया असलेल्या लोकांना डॉक्टरांनी सांगितल्यानुसार हिप रिप्लेसमेंट (आर्थ्रोप्लास्टी) पर्यायाची निवड करावी.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग