Remedies for Sport Injury: क्रीडा दुखापती दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागल्या जातात. त्यातील एक म्हणजे तीव्र दुखापत आणि दुसरी ही स्नायुंच्या अतिवापरामुळे होणारी दुखापत. हात पाय मुरगळणे, स्नायुंवरील अतिरिक्त ताण आणि फ्रॅक्चरसारखी तीव्र शारीरीक जखम, शारीरिक क्रिया आणि अवयवांवर होणारा आघात अशा घटनांमुळे शारीरीक दुखापती होऊ शकतात. स्नायू, अस्थिबंध आणि सांधे यांच्यावर वारंवार येणाऱ्या ताणामुळे दुखापती होऊ शकतात आणि वेळीच उपचार न केल्यास त्रासदायक वेदना होतात. धक्कादायक बाब म्हणजे सतत धावल्यामुळे जसे की सॉकर आणि बास्केटबॉल सारख्या खेळामध्ये सर्वाधिक प्रमाणात गुडघ्यांच्या दुखापती होतात. खांद्याच्या दुखापतींमध्ये व्हॉलीबॉल किंवा बास्केटबॉल सारखे खेळ किंवा ओव्हरहेड हालचालींचा समावेश होतो. जेव्हा क्रीडा संबंधित दुखापतींचा प्रश्न येतो तेव्हा प्रतिबंध महत्त्वाचा असतो. याबाबत वाशी, नवी मुंबई येथील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अभय छलानी यांनी काही उपाय सांगितले आहेत.
दुखापत झाल्यानंतर ऑर्थोपेडिककडून स्वतःचे मूल्यमापन करणे अत्यावश्यक आहे. कारण सुरुवातील किरकोळ वाटणाऱ्या अनेक जखमा भविष्यात अधिक गंभीर होतात. ज्यामुळे एखाद्याच्या हालचालींवर परिणाम होतो. यासाठी तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.
प्रत्येक दुखापत सामान्य नसते. त्यामुळे त्याची लक्षणे आणि तुम्हाला कसे वाटते याकडे बारकाईने लक्ष द्या. जसे की अचानक गुडघा आखडणे जे सहसा मेनिस्कल टीअरचे लक्षण असते (एक प्रकारची क्रिडा दुखापत) तसेच स्नायूंची दुखापत याकडे देखील वेळेवर लक्ष देणे आवश्यक आहे.
घरगुती उपचारांचा विचार केल्यास आईस पॅक(बर्फ) वापरणे चांगले राहिल. जेव्हा तुम्हाला एखादी गंभीर दुखापत होते, ज्यामुळे सूज किंवा वेदना होतात तेव्हा तुम्हाला ऑर्थोपेडिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खेळाच्या दुखापती गंभीर असतात म्हणून स्वत:च्या मर्जीने औषधपचार करणे टाळा. डॉक्टरांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा आणि दुखापत झाल्यास घरच्या घरी मसाज करण्याचा प्रयत्न टाळा.
काही खेळाडू वर्कआउट किंवा खेळ पूर्ण करण्यासाठी वेदना सहन करण्याचा प्रयत्न शकतात. परंतु अशा परिस्थितीत शरीराला विश्रांतीची गरज असते. या परिस्थितीत पुरेसा आराम करा आणि तज्ञांच्या सल्ल्याने पुन्हा खेळास सुरुवात करा. दुखापतीकडे दुर्लक्ष केल्याने आणि शारीरिक हालचाली सुरू ठेवल्याने वेदना वाढू शकतात. शरीरास अधिक जडपणा येऊ शकतो आणि उपचार प्रक्रियेस विलंब होऊ शकतो. याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे तुमच्या आरोग्यास प्राधान्य देणे आणि स्वत:ला बरे होण्यासाठी पुरेसा वेळ देणे.
प्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, कडधान्ये आणि डाळी यांचे सेवन करा. जलद पुनर्प्राप्ती आणि उपचारांसाठी आहारात प्रथिने आणि कॅल्शियुक्त पदार्थांचा समावेश करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या