मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sunday Brunch मध्ये बनवा टेस्टी पनीर पॅनकेक, काही मिनिटांत होतात तयार

Sunday Brunch मध्ये बनवा टेस्टी पनीर पॅनकेक, काही मिनिटांत होतात तयार

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 05, 2023 12:09 PM IST

Sunday Special Recipe: रविवार खास बनवायचा असेल तर लहान मुले आणि मोठ्यांसाठी टेस्टी पनीर पॅनकेक बनवा. हे बनवायला खूप सोपे आहे आणि खूप लवकर तयार होते.

पनीर पॅनकेक
पनीर पॅनकेक

Paneer Pancake Recipe: रविवारचा दिवस आळसावलेला असतो. मुलांच्या शाळेपासून ऑफिसपर्यंत सर्वांना सुट्टी असल्याने दिवसाची सुरुवात आरामात होते. अशा वेळी किचनमध्ये जाऊन नाश्ता तयार करणे अवघड वाटते. शिवाय घरातील प्रत्येक सदस्य काही खास पदार्थाची मागणी करू लागतो. अशावेळी सकाळच्या नाश्त्याऐवजी अनेक जण ब्रंचचा पर्याय निवडतात. तुम्हाला सुद्धा काही स्पेशल बनवण्याचा विचार करत असाल तर पनीर पॅनकेक्स बनवू शकता. ते खूप लवकर तयार होईल आणि त्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. पनीर पॅनकेक्स तुमच्या रविवारच्या ब्रंचसाठी योग्य रेसिपी आहे. चला तर मग जाणून घेऊया पनीर पॅनकेक कसे बनवायचे.

पनीर पॅनकेक बनवण्यासाठी साहित्य

- एक कप रवा

- ३/४ कप दही

- १/२ टीस्पून मीठ

- १/२ कप पाणी

- १/२ टीस्पून इनो

पनीरचे मिश्रण बनवण्यासाठी साहित्य

- एक वाटी पनीर बारीक किसलेले

- १ बारीक चिरलेला कांदा

- १ गाजर बारीक चिरलेला

- २ चमचे वाटाणे

- २ टेबलस्पून सिमला मिरची बारीक चिरलेली

- स्वीट कॉर्न

- काळी मिरी पावडर

- चिली फ्लेक्स

- २ चमचे तेल

- मीठ चवीनुसार

पनीर पॅनकेक बनवण्याची कृती

सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये एक कप रवा आणि तीन-चतुर्थांश कप दही घ्या. सोबत मीठ घालून चांगले फेटून घ्या. दहा मिनिटे राहू द्या. नंतर गॅसवर पॅन गरम करून त्यात दोन चमचे तेल घाला. तेल गरम होताच अर्धा कांदा बारीक चिरून त्यात घाला. ते गोल्डन झाल्यावर त्यात गाजर, वाटाणे, स्वीट कॉर्न, सिमला मिरची घालून शिजवा. भाजी जास्त शिजू नये हे लक्षात ठेवा. आता त्यात मिरी पावडर, चिली फ्लेक्स आणि मीठ घाला. चांगले मिक्स करा आणि किसलेले पनीर घाला. या सर्व गोष्टी नीट मिक्स करुन घ्या.

आता रव्याचे तयार केलेले बॅटर घ्या आणि त्यात भाज्या आणि पनीरचे हे मिश्रण मिक्स करा. या पिठात अर्धा टीस्पून इनो पावडर घाला. सोबत तीन चमचे पाणी घालावे. हे बॅटर इडलीच्या बॅटर प्रमाणे स्मूद आणि घट्ट ठेवा. आता पॅनमध्ये तेल टाकून गरम करा. त्यावर पनीर पॅनकेकचे बॅटर टाका. यावर झाकण ठेवून साधारण दोन मिनिटे शिजवा. एक बाजू सोनेरी झाल्यावर पॅनकेक पलटवा. दोन्ही बाजूने नीट ब्राउन भाजल्यावर काढून घ्या. गोड चटणी किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

 

WhatsApp channel