मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Baby Massage Tips: बाळाची मालिश करताना करू नका या चुका, पाहा कधी आणि कसा द्यावा मसाज

Baby Massage Tips: बाळाची मालिश करताना करू नका या चुका, पाहा कधी आणि कसा द्यावा मसाज

Hiral Shriram Gawande HT Marathi
Oct 19, 2023 08:42 PM IST

New Born Baby Massage: बाळाच्या शरीराच्या चांगल्या वाढीसाठी मसाज खूप महत्त्वाचा आहे. तसेच आई आणि बाळ यांच्यातील बंधही दृढ होतो. तुमच्या बाळाला मसाज केव्हा सुरू करावे आणि कसे करावे हे येथे जाणून घ्या.

बाळाची मालिश करण्यासाठी टिप्स
बाळाची मालिश करण्यासाठी टिप्स (unsplash)

When and How To Give Massage to Baby: जन्मानंतर बाळ खूप संवेदनशील असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्यांचे शरीर देखील नाजूक असते आणि ते मजबूत करण्यासाठी मालिश करण्याचे सांगितले जाते. मसाज केवळ मुलांना मजबूत बनवते असे नाही तर ते आईसोबतचे नाते दृढ करण्याचा एक मार्ग आहे. बाळ जेव्हा गर्भातून बाहेर येतात तेव्हा त्यांना त्यांच्या आईचे प्रेम स्पर्शातूनच कळते. आई आणि बाळ दोघांसाठीही एकत्र वेळ घालवण्याचा मसाज हा एक उत्तम मार्ग आहे. हा अनुभव अधिक चांगला होण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जसे की तेलाची निवड, मसाज कधी सुरू करायचा, किती दिवस इ.

ट्रेंडिंग न्यूज

बाळाला मसाज केव्हा सुरू करावे?

अनेकदा पालक बाळाची मालिश करण्याची घाई करतात. मूल जेव्हा या जगात येते तेव्हा त्याला जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. विशेषत: जर बाळ प्रिमॅच्युअर असेल तर मसाज करताना घाई करू नये. अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की नवजात बाळाची त्वचा संवेदनशील असते. तसेच त्यांच्या त्वचेला जास्त थर नसतात त्यामुळे ती संवेदनशील असते. त्यामुळे किमान २-३ आठवडे किंवा शक्य असल्यास महिनाभराने मसाज सुरू करा. दिवसेंदिवस बाळाला हळूवारपणे सांभाळत राहा जेणेकरून त्याला आईचा स्पर्श जाणवत राहील.

मसाजसाठी कोणते तेल वापरावे?

अनेक वेळा पालकांच्या मनात प्रश्न असतो की मसाजसाठी कोणते तेल वापरावे. बाळाला मालिश करण्यासाठी कोणतेही तेल निवडू नका, त्याऐवजी व्हेजिटेबल ऑइल आणि मिनरल बेबी ऑइल योग्य मानले जाते. मात्र, बाळाला पुरळ येत नाही ना, हे तपासणे गरजेचे आहे. अनेक लोक खोबरेल तेलाने मसाज करतात. ऑलिव्ह, मोहरी आणि तूप यामध्ये ऑलिक अॅसिड जास्त असते. काही लोकांचा असा विश्वास आहे की यामुळे मुलांची त्वचा आणखी कोरडी होऊ शकते. जर तुम्ही यापैकी कोणत्याही तेलाने मसाज करत असाल आणि कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत तर तुम्ही हे वापरू शकता. याशिवाय सुगंधित इसेंशियल ऑइल्स वापरू नका.

किती दिवस मसाज करायचा?

काही लोक सकाळ संध्याकाळ असे दोन वेळा बाळाला मसाज देतात. काही लोक दिवसातून एकदा तर काही लोक दोन दिवसातून एकदा करतात. ते तुमच्या सोयीवर अवलंबून आहे. फक्त लक्षात ठेवा खोलीचे तापमान खूप थंड किंवा खूप गरम नसावे. बाळ उपाशी नसावे. अशा जागी बसून मसाज करा की मुल सुरक्षित राहील आणि दुखापत होण्याचा धोका नाही.

किती वेळ करावा मसाज?

तुम्ही बाळाला १० ते ३० मिनिटे मसाज करू शकता. मसाज करण्याची उत्तम वेळ म्हणजे झोपण्यापूर्वी आणि आंघोळीनंतर. काही लोक आंघोळीपूर्वीही मसाज करतात. जर तुम्ही घट्ट तेल घेत असाल तर आंघोळीपूर्वी मसाज करा. जर ते हलके आणि मॉइश्चरायझिंग तेल असेल तर आंघोळीनंतर मालिश करण्यास हरकत नाही.

कसा करावा मसाज?

बाळाला हलक्या हाताने मसाज करा. वरच्या भागाला मसाज करताना दोन्ही खांद्यापासून सुरुवात करा. खांद्यापासून छातीपर्यंत हलके स्ट्रोक द्या. हातांना मसाज करण्यासाठी खांद्यापासून मनगटापर्यंत मालिश करा. सर्कुलर मोशनमध्ये पोटाची मालिश करा. जर नाळ बरी झाली नसेल तर नाभीपासून दूर रहा. बाळाच्या स्तनाग्र आणि पोटावर दबाव आणू नका.

कधीपर्यंत करावा मसाज

लहान मुल असो वा मोठे मसाज प्रत्येकासाठी फायदेशीर असते. मूल मोठे होईपर्यंत तुम्ही मसाज करत राहू शकता. तुम्हा हवे असेल तर जेव्हा मूल मोठे होईल तेव्हा त्याला स्वतःला मालिश करण्यास शिकवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel