Tuzech Mi Geet Gaat Aahe latest Episode 13 September 2023: ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत आता भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. एकीकडे मल्हारच्या घरात राहत असलेला ‘स्वराज’ हा मुलगा नसून, मुलगी असल्याचं सत्य आता सगळ्यांसमोर उघड झालं आहे. मोनिकाने स्वराजचा विग काढून त्याचं सत्य समोर आणलं आहे. स्वराजचं सत्य कळल्यानंतर आता मल्हारला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. स्वराजने आपली फसवणूक केली असे वाटून तो त्याच्यावर रागावून बसला आहे. मात्र, आता त्याच्या मनातील बाबा जागा होणार आहे.
स्वराजचं सत्य समोर आल्याने मल्हार पूर्णपणे कोलमडून गेला आहे. त्याने या सगळ्या प्रकरणावर आपला संताप देखील व्यक्त केला आहे. तर, स्वर देखील आपलं सत्य समोर आल्याने घाबरून गेली आहे. तिने आपण पुन्हा कधीच तुमच्यासमोर येणार नाही असं वचन मल्हारला दिलं आहे. मात्र, आता स्वराला पाहून मल्हारला वैदहीची आठवण येणार आहे. तर, त्याने आणि वैदहीने मिळून पाहिलेल्या स्वतःची आठवण देखील त्याला यावेळी होणार आहे.
मल्हार मोनिकाशी लग्न करण्याआधी एका खेडे गावातील वैदही नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. वैदही आणि मल्हारने गंधर्व विवाह देखील केला होता. मात्र, त्यांच्या या लग्नाला कुणीच साक्षी नसल्याने याबद्दल कुणाला कळले देखील नाही. मात्र, कामाच्या निमित्ताने मुंबईत परतलेल्या मल्हारला काही अटी आणि करारांमुळे मोनिकाशी लग्न करावं लागलं. यानंतर मल्हार मोनिकासोबत प्रामाणिकपणे संसार करत होता. तर, दुसरीकडे वैदहीला आई होणार असल्याची चाहूल लागली होती. मात्र, या गोष्टीबद्दल मल्हारला काहीच कल्पना नव्हती. तर, वैदेही मात्र मल्हारची वाट बघत राहिली होती. काही वर्षांनी मल्हारच्या आठवणीत तिचे निधन झाले.
वैदहीच्या निधनानंतर स्वराच्या मामाने तिला तिच्या बाबाकडे म्हणजे मल्हारकडे नेऊन सोडण्याचा निर्णय घेतला होता. तर, स्वराला शांतीने राहतात यावं, तिच्या मामीमुळे जाच होऊ नये, यासाठी त्याने स्वराला ‘स्वराज’चं रूप दिलं होतं. आता स्वरा मल्हारसमोर आल्यानंतर लवकरच त्याला ती आपली आणि वैदहीची मुलगी असल्याचे देखील कळणार आहे. यानंतर त्याचा स्वरावरील राग देखील निवळून जाणार आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे भावनिक वळण पाहायला मिळणार आहे.