मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ५ दिवसांत पार केला ५० कोटींचा टप्पा!

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ५ दिवसांत पार केला ५० कोटींचा टप्पा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 10, 2023 09:38 AM IST

The Kerala Story BO Collection: ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले असून, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

The Kerala Story
The Kerala Story

The Kerala Story BO Collection: सुदीप्तो सेन दिग्दर्शित अभिनेत्री अदा शर्माचा चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाला काही ठिकाणांहून प्रचंड विरोध होत आहे, तर काहींनी मात्र या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक ठिकाणी विरोधाच्या भीतीने या चित्रपटाचे प्रदर्शनही थांबवून त्यावर बंदी घालण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची घोषणा केली, ज्यावर चाहत्यांच्या तिखट प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या. मात्र, या गोष्टींचा चित्रपटाच्या कमाईवर कोणताही परिणाम होताना दिसत नाहीय. तीव्र विरोध होत असतानाही हा चित्रपट चांगली कमाई करत आहे.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले असून, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. काही ठिकाणी तो करमुक्त करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. एवढं सगळं होऊनही या चित्रपटाने रिलीजच्या ५ दिवसांत ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. कमी बजेटच्या चित्रपटासाठी हा खूप सकारात्मक आकडा आहे.

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ची कथा रामदास स्वामींनी लिहिली; अभिनेते योगेश सोमण यांचा व्हिडीओ व्हायरल

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जवळपास ८ कोटींची कमाई केली होती. पहिल्या वीकेंडमध्ये या चित्रपटाने एकूण ३५ कोटींची कमाई केली. सोमवारी देखील या चित्रपटाने १० ते ११ कोटींची कमाई केली. यानंतर आता या चित्रपटाचे कलेक्शन ४६ कोटींवर पोहोचले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने रिलीजच्या पाचव्या दिवशी ११ कोटी कमवत दमदार प्रवास सुरू ठेवला आहे. तसेच, या चित्रपटाने ५ दिवसांत ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. अवघ्या ५ दिवसांत या चित्रपटाने मेकिंग बजेट वसूल केले आहे.

आता चित्रपटाच्या नजरा १०० कोटींच्या क्लबकडे लागल्या आहेत. या वीकेंडपर्यंत हा चित्रपट १०० कोटींहून अधिक कमाई करू शकेल, असे म्हटले जात आहे. याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून, विपुल अमृतलाल शाह यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात अदा शर्मा मुख्य भूमिकेत झळकली आहे.

IPL_Entry_Point