Tharala Tar Mag 7th Oct Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता अर्जुनच्या प्रार्थनांना यश आलं आहे. अर्जुनच्या प्रेमामुळे आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर आता सायलीचा जीव वाचला असून, ती शुद्धीवर आली आहे. या कठीण प्रसंगात देखील सायलीची आई अर्थात प्रतिमाचं तिच्या मदतीला धावून आली आहे. आपली मुलगी या जगात आजही जिवंत आहे, याची कल्पना नसलेली आई नकळत आपल्याच मुलीचा जीव वाचवण्यासाठी धावून आली आहे. मात्र, आता अनेक काळ एकमेकांपासून दुरावलेली नाती पुन्हा एकदा एकमेकांसमोर येताना दिसणार आहेत. यामुळे त्यांच्या आयुष्यात मात्र खळबळ उडणार आहे.
गणपतीच्या मिरवणुकीत सायलीवर चाकू हल्ला झाला होता. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. यानंतर अर्जुनने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे तिचा जीव धोक्यात आला होता. तिचा रक्तगट अगदीच दुर्मिळ असल्यामुळे तिचा जीव वाचवणे देखील कठीण झाले होते. मात्र, त्याचवेळी योगायोगाने हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या प्रतिमाच रक्तगट जुळल्याने, तिने रक्तदान करून सायलीचा जीव वाचवला. मात्र, सायली आपलीच मुलगी आहे, या सत्यापासून ती अनभिज्ञ आहे. आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या प्रतिमासमोर रविराज येणार आहे.
खूप वर्षांपूर्वी सायली म्हणजेच तन्वीच्या कुटुंबाचा एका मोठा अपघात झाला होता. या अपघातात सायली आणि तिची आई प्रतिमा यांचे निधन झाले, असे सगळ्यांना वाटत होते. मात्र, सायली एका अनाथ आश्रमात पोहोचली. तर, तिची आई मात्र कुठेतरी अज्ञातवासात निघून गेली. यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब विस्कळीत झालं. मात्र, आता ते पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे. सायलीच्या अपघातामुळे त्यांचं दुरावलेलं कुटुंब आता एकत्र येणार आहे. यामुळे सायलीच्या आयुष्यात मात्र अनेक नवे प्रश्न उभे राहणार आहेत.
आता जर सायलीच्या जन्माचं सत्य सगळ्यांसमोर आलं तर, प्रियाचा खोटेपणा देखील सिद्ध होणार आहे. प्रिया सध्या रविराजच्या घरी तन्वी म्हणून राहत आहे. मात्र, आपण नाही तर, सायली हिच खरी तन्वी आहे, याची प्रियाला पूर्ण कल्पना आहे. आपलं बिंग फुटू नये म्हणून प्रियानेच सायलीवर हल्ला घडवून आणला होता.