Mission Raniganj Review: अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ पाहण्याचा विचार करताय? कसा आहे चित्रपट जाणून घ्या...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mission Raniganj Review: अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ पाहण्याचा विचार करताय? कसा आहे चित्रपट जाणून घ्या...

Mission Raniganj Review: अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ पाहण्याचा विचार करताय? कसा आहे चित्रपट जाणून घ्या...

Oct 07, 2023 09:27 AM IST

Mission Raniganj Review: ‘मिशन रानीगंज’ हा कोल इंडियाचे इंजिनिअर जसवंत सिंह गिल यांच्या धाडसी पराक्रमाची कथा सांगणारा चित्रपट आहे.

Mission Raniganj Review
Mission Raniganj Review

Mission Raniganj Review: बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार नेहमीच काहीतरी नवीन कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात एक वेगळी गोष्ट आणि एक वेगळा थरार असतो. आता त्याचा ‘मिशन रानीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात देखील एक हटके कथानक पाहायला मिळालं आहे. ‘मिशन रानीगंज’ हा एक बायोपिक चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार याने कोल इंडियाचे इंजिनिअर जसवंत सिंह गिल यांची भूमिका साकारली आहे. जसवंत यांनी भीमपराक्रम करून कोळसा खाणीत काम करणाऱ्या तब्बल ७० मजुरांचा जीव वाचवला होता. हीच कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

काय आहे या चित्रपटाचं कथानक?

‘मिशन रानीगंज’ हा कोल इंडियाचे इंजिनिअर जसवंत सिंह गिल यांच्या धाडसी पराक्रमाची कथा सांगणारा चित्रपट आहे. १९८९मध्ये पश्चिम बंगालमध्ये आलेल्या महापुरामध्ये कोळसा खाणीत काम करणारे तब्बल ७० मजूर आत खाणीतच अडकून पडले होते. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, कुणालाच यश येत नव्हते. सगळ्यांचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर जसवंत सिंह गिल एक जुगाड करून शक्कल लढवतात आणि एक-एक करून या सगळ्या मजुरांना सुखरूप बाहेर काढतात. हा चित्रपट त्याच पराक्रमी रात्रीची कहाणी आहे.

Sindhutai Majhi Mai: ‘चिंधी’चा ‘सिंधू’ होण्याचा प्रवास झाला सुरू; तुम्ही ओळखलंत का ‘या’ नव्या अभिनेत्रीला?

कसा आहे एकंदरीत चित्रपट?

‘ओएमजी २’ काहीसा आपटल्यानंतर प्रेक्षकांना आणि स्वतः अक्षयला देखील ‘मिशन रानीगंज’ चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारने जसवंत गिल यांची भूमिका उत्तम वठवली आहे. या चित्रपटाचा स्क्रीनप्ले प्रेक्षकांना अनेक दृश्यांवर खिळवून ठेवतो. अक्षय कुमारच्या भूमिकेवर अधिक जोर देण्यात आला आहे. काही दृश्यांमध्ये अक्षयला जास्तीचा भाव दिल्यासारखा वाटतो. यामुळे मजुरांच्या समस्या, ती दारूण स्थिती काही अंशी झाकोळली जाते. कथानकावर आणखी काम करता आले असते. चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा धीमा वाटतो. तर, उत्तरार्ध मात्र चांगल्या गतीने पुढे जातो आणि प्रेक्षकांना चित्रपटाशी बांधून ठेवतो.

या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय चांगला आहे. अक्षय कुमारने ही कठीण परिस्थिती हाताळताना जसवंत यांनी किती शांतपणाने आणि संयमाने काम केले असले, हे सुंदररीत्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर, अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने या चित्रपटात जसवंत सिंह गिल यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. समोर येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये ती आपल्या पतीसोबत अतिशय खंबीरपणे उभी राहते. तर, अभिनेता दिब्येंदू भट्टाचार्य याने या चित्रपटात भ्रष्ट अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. तर, इतर कलाकारांच्या अभिनयाची भट्टी देखील चांगलीच जमून आली आहे. तुम्ही देखील तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत हा चित्रपट पाहायल जाऊ शकता.

चित्रपट: मिशन रानीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू

कलाकार: अक्षय कुमार, परिणीती चोप्रा, दिब्येंदू भट्टाचार्य, पावन मल्होत्रा, कुमुद मिश्रा, वरून बदोला

दिग्दर्शक: टिनू सुरेश देसाई

Whats_app_banner