मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TDM Movie Song: नंदेश उमप यांचा सुरेल स्वरसाज, यंदाच्या लगीनसराईत धुमाकूळ घालणार ‘बकुळा’!

TDM Movie Song: नंदेश उमप यांचा सुरेल स्वरसाज, यंदाच्या लगीनसराईत धुमाकूळ घालणार ‘बकुळा’!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 21, 2022 11:39 AM IST

TDM Movie Song: यंदाच्या लग्नसराईत एका नव्या गाण्याचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. ‘टीडीएम’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘बकुळा’ हे लग्नगीत नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Bakula Song
Bakula Song

Bakula Song Out: दिवाळी सरली आणि तुळशीचं लग्न पार पडलं की, सगळ्याच घरांमध्ये लग्न सोहळ्यांची लगबग सुरु होते. लग्न घर म्हटलं की, संगीत, हळद आणि इतर कार्यक्रमांचा जल्लोष असतो. यातच घराघरातून ऐकू येतात ती, वेगवेगळी गाणी. काही गाण्यांची तर, आपल्याला इतकी सवय झालीये की, त्या गाण्यांशिवाय लग्न सोहळा पार पडला असं वाटतच नाही. अशाच गाण्यांच्या यादीत सामील होण्यासाठी आता एक नवं गाणं सज्ज झालं आहे. यंदाच्या लग्नसराईत या नव्या गाण्याचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. आगामी ‘टीडीएम’ या मराठी चित्रपटातील ‘बकुळा’ हे लग्नगीत नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लग्नगीतांचा पॅटर्न हा हळदीचा, वरातीच्या गाण्यांचा असला, तरी माहेरहून सासरी जाणाऱ्या मुलीसाठी आई, वडील, बहीण, भाऊ यांची होणारी घुटमळ या सगळ्या भावनांची गुंफण घालून प्रेक्षकांचा दिलाचा ठोका चुकवायला 'टीडीएम' चित्रपटातील 'बकुळा' हे नवंकोरं गाणं सज्ज झालं आहे. 'बकुळा' या गाण्यात लग्नातील धमाल-मस्ती सोबतच नववधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ तसेच लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग आणि आई, वडील आणि भावाच्या मनातील घुटमळ या सगळ्यांचा उत्तम मिलाफ दिसणार आहे.

‘टीडीएम’ या बहुचर्चित चित्रपटातील डॉ. विनायक पवार यांनी लिहिलेल्या या गीताला गायक नंदेश उमप, ओंकारस्वरूप बागडे आणि गायिका प्रियांका बर्वे यांनी आपल्या मधुर स्वरांनी चारचाँद लावले आहेत. ‘बकुळा’ हे गाणे ओंकारस्वरूप बागडे आणि वैभव शिरोळे यांनी संगीतबद्ध केले आहे. 'बकुळा' या गाणयातून हळवे बंध उलगडले जाणार असून, नंदेश उमप यांनी अगदी जीव ओतून हे गाणे स्वरबद्ध केले आहे. या गीताचे बोल अतिशय हृदयस्पर्शी असून, सर्वसामान्य माणसांच्या मनाला चटका लावून जाणारे आहेत. आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले असून, 'बकुळा' या गाण्याला प्रेक्षकांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. बहुचर्चित ‘टीडीएम’ हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point