
Taarak Mehta Ka Oooltah Chashma Controversy: छोट्या पडद्यावरच्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. या शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी वर्षभरापूर्वीच या शोचा निरोप घेतला होता. मात्र, शो सोडल्यानंतरही शैलेश लोढा आणि शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यातील वाद आता संपण्याचे नाव घेत नाहीये. नुकतीच अभिनेते शैलेश लोढा यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये असित मोदींचे प्रोडक्शन हाऊस नीला टेलिफिल्म्सविरोधात तक्रार दाखल केली आहे.
या विषयावर बोलताना तारक मेहताचे निर्माते असित मोदी यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘मला काही महिन्यांपूर्वी एक नोटीस मिळाली आहे. मी शैलेशला त्याचे पैसे देण्यास कधीही नकार दिलेला नाही. पण, प्रत्येक कंपनीचे काही नियम असतात. शो सोडल्यानंतर शैलेश यांनी काही औपचारिकता पूर्ण करणे बाकी आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हिशोब पूर्ण केला जाईल. यासाठी दररोज आमची टीम शैलेशला मेल आणि मेसेजद्वारे औपचारिकता पूर्ण करण्याची विनंती करते. पण कदाचित आता शैलेशलाच त्यात रस नाही असे वाटते.’
असित मोदी याविषयी बोलताना पुढे म्हणाला की, ‘जेव्हा तुम्ही अनेक वर्षे एकत्र काम करता, तेव्हा किरकोळ भांडणे होणे स्वाभाविक आहे. कुटुंबात भांड्याला भांडी लागतात. शैलेशला या शोसोबतच कवी संमेलनांमध्ये भाग घ्यायचा होता. पण, तारक मेहता का उल्टा चष्मा हा डेली सोप आहे, ज्याचं रोज चित्रीकरण सुरू असतं. त्यामुळे शैलेशला या दुसऱ्या गोष्टीसाठी वेळ देणे आम्हाला शक्य नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आमच्यात काही वाद झाले आणि त्यानंतर शैलेश पुन्हा शूटिंगला आलाच नाही.’
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते आणि अभिनेता शैलेश लोढा यांच्यातील वाद आता दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. एकीकडे शैलेश लोढा निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर अनेक आरोप करत आहे. तर, आता असित कुमार मोदी यांनी देखील पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. दोघांमधील हा वाद आता थेट कोर्टात पोहोचला आहे.
संबंधित बातम्या
