मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Subhedar: बॉक्स ऑफिसवरही ‘सुभेदार’ची जरब; अवघ्या तीन दिवसांत केली ‘इतकी’ कमाई!

Subhedar: बॉक्स ऑफिसवरही ‘सुभेदार’ची जरब; अवघ्या तीन दिवसांत केली ‘इतकी’ कमाई!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Aug 28, 2023 09:53 AM IST

Subhedar Box Office Collection: ‘सुभेदार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, या चित्रपटाचे भरपूर कौतुक होत आहे. आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.

Subhedar Box Office collection
Subhedar Box Office collection

Subhedar Box Office Collection: छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास सांगणारे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. महाराजांच्या इतिहासातील एक सुवर्ण पान म्हणजे तानाजी मालुसरे. छत्रपतींच्या या सुभेदाराने ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं...’ असं म्हणत कोंढाणा किल्ल्याची मोहीम फत्ते केली. या मोहिमेत त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. इतिहासातील हेच पान उलगडून दाखवणारा ‘सुभेदार’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या ३ दिवसांत या चित्रपटाने जवळपास ५ कोटींची कमाई केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘सुभेदार’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पासूनच प्रचंड चर्चेत होता. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने बुक माय शोवर तब्बल ४० हजारांहून अधिक लाईक्स मिळवले होते. असा विक्रम रचणारा ‘सुभेदार’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला होता. आता प्रदर्शनानंतर ‘सुभेदार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, या चित्रपटाचे भरपूर कौतुक होत आहे. आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. या चित्रपटाने आता जवळपास ५ कोटींचा टप्पा गाठला असून, थिएटरबाहेर हाऊसफुलचे बोर्ड झळकले आहेत.

Jailer Collection: भारतातच नव्हे तर जगभरात वाजला रजनीकांत यांचा डंका! ‘जेलर’च्या कलेक्शनने गाठला मोठा टप्पा!

रिलीजच्या पहिल्याच दिवशी अर्थात शुक्रवारी (२५ ऑगस्ट) ‘सुभेदार’ या चित्रपटाने १.०५ कोटींची ओपनिंग मिळवली होती. तर, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने १.८० कोटींचा गल्ला जमवला. तर, रविवारी या चित्रपटाला सुट्टीचा देखील फायदा मिळाला आहे. रविवारची सुट्टी असल्याने अनेकांनी आपल्या कुटुंबासमवेत ‘सुभेदार’ हा चित्रपट पाहिला आहे. रविवारी देखील या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. अंदाजे आकडेवारीनुसार रविवारी या चित्रपटाने २.३० कोटींची कमाई केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, हा अंदाजे आकडा असल्याने यात तफावत देखील असू शकते. परंतु, आता या चित्रपटाने ५ कोटींची कमाई करत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात ‘कोंढाण्याचा सिंहपराक्रम’ करणारे सुभेदार तानाजी मालुसरे यांनी आपले संपूर्ण आयुष्यच स्वराज्याला अर्पण केले होते. कोंढाण्यावर यशस्वी चढाई करणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘सुभेदार’ या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीरधर्माधिकार, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर, शिवानी रांगोळे,नूपुर दैठणकर, भूषण शिवतरे, श्रीकांत प्रभाकर, बिपीन सुर्वे, अलका कुबल, राजदत्त, ऐश्वर्या शिधये, सौमित्र पोटे, संकेत ओक, सुनील जाधव, मंदार परळीकर, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, दिग्विजय रोहिदास, रिषी सक्सेना, ज्ञानेश वाडेकर, मृण्मयी देशपांडे, दिग्पाल लांजेकर, आस्ताद काळे, पूर्णानंद वाडेकर अशी भलीमोठी तगडी कास्ट या चित्रपटात पाहायला मिळाली आहे.

IPL_Entry_Point