Vedat Marathe Veer Daudale Saat: मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची भरपूर चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून स्वराज्याच्या इतिहासातील एक सुवर्ण पान उलगडलं जाणार आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सात शूरवीर मावळ्यांची कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर देखील एका मोठ्या भूमिकेत दिसणार होता. मात्र, आता सत्या मांजरेकर या चित्रपटातून बाहेर पडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखांचे फर्स्ट लूक या आधीच रिलीज करण्यात आले आहेत. मात्र, यानंतर अनेकांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटावर सडकून टीका देखील केली होती. तर, महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर साकारत असलेल्या भूमिकेवरून देखील चित्रपटाला ट्रोल करण्यात येत होते. मात्र, आता या टिकेनंतर सत्या चित्रपटातून बाहेर पडला, असल्याचे म्हटले जात आहे. याला कारणीभूत ठरला आहे तो त्यांचा एक वर्कआऊट व्हिडीओ...
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ची संपूर्ण टीम सध्या या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे कलाकार सध्या जीममध्ये घाम गाळत आहेत. अभिनेता जय दुधाणे, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, हार्दिक जोशी, प्रवीण तरडे सगळेच कलाकर एकत्र वर्कआऊट करताना दिसतात. या वर्कआऊटचे व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. या व्हिडीओत मात्र सत्या मांजरेकर कुठेच दिसत नाहीये. तर, या टीमसोबत अभिनेता आरोह वेलणकर वर्कआऊट करताना दिसत आहे.
या टीममध्ये सत्या मांजरेकर ऐवजी आरोह वेलणकर दिसत असल्याने आता सत्या चित्रपटातून बाहेर पडला का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चित्रपटाचे निर्माते किंवा कलाकार यांनी अद्याप यावर भाष्य केलेले नाही.