मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan Collection: अखेर ‘पठाण’ने मोडला ‘बाहुबली २’चा विक्रम; बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई!

Pathaan Collection: अखेर ‘पठाण’ने मोडला ‘बाहुबली २’चा विक्रम; बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 04, 2023 12:35 PM IST

Pathaan Box Office Collection: रिलीजच्या सहाव्या आठवड्यात ‘पठाण’ या चित्रपटाने प्रभासच्या ‘बाहुबली २’चा बॉक्स ऑफिस विक्रम मोडला आहे.

Pathaan Box Office Collection
Pathaan Box Office Collection

Pathaan Box Office Collection: बॉलिवूड किंग शाहरुख खान याच्या ‘पठाण’ची छप्परफाड कमाई अजूनही सुरू आहे. आता रिलीजच्या तब्बल ३८ दिवसानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील ‘बाहुबली २’ या चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला आहे. ‘पठाण’समोर इतर बॉलिवूड चित्रपट अक्षरशः सपाटून आपटले आहेत. अक्षय कुमार. कार्तिक आर्यनसारख्या बड्या कलाकारांची जादू देखील ‘पठाण’समोर फिकी पडली आहे. ‘पठाण’ने रिलीजच्या ३८व्या दिवशी ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड मोडीत काढत, सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट असा बहुमान मिळवला आहे.

‘पठाण’ या चित्रपटाचं शुक्रवारचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शननुसार आता ‘पठाण’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने एकूण ५११.७५ कोटींची कमाई केली आहे. तर, इतर भाषांमध्ये ५२९.४४ कोटींची कमाई झाली आहे. या चित्रपटाने वर्ल्डवाईडमध्ये १०२९ कोटींचा टप्पा गाठला आहे. जगभरातील चाहते ‘पठाण’वर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण स्टारर हा चित्रपट रिलीजच्या महिनाभरानंतर अजूनही कोटींच्या आकड्यात कमाई करत आहे.

रिलीजच्या सहाव्या आठवड्यात या चित्रपटाने प्रभासच्या ‘बाहुबली २’चा बॉक्स ऑफिस विक्रम मोडला आहे. ‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर ५१०.९९ कोटींची कमाई केली होती. ‘बाहुबली २’ हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. मात्र, आता ५११.७५ कोटींचा टप्पा पार करत ‘पठाण’ चित्रपटाने ‘बाहुबली २’ला देखील चीतपट केले आहे. ‘पठाण’च्या या घवघवीत यशानंतर आता जगभरातील चाहते या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

सिद्धार्थ आनंद याच्या ‘पठाण’ या चित्रपटातून बॉलिवूड किंग शाहरुख खान याने तब्बल चार वर्षानंतर मनोरंजन विश्वात पुनरागमन केले आहे. त्याचे हा कमबॅक चांगलाच हिट ठरला आहे. आता त्याच्या आगामी ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसले आहेत.

IPL_Entry_Point