Movies Releasing This Week May 26:मे महिना आता संपतच आला आहे. मे महिना म्हणजे सुट्ट्यांचा आणि भटकंतीचा महिना. या महिन्यात मुलांना सुट्ट्या असल्याने पालकांना देखील निवांत वेळ मिळतो. अशा परिस्थितीत या सुट्ट्यांचा फायदा मिळावा म्हणून अनेक चित्रपट देखील रिलीज करण्यात आले आहेत. आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणखी काही दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. केवळ हिंदीच नव्हे, तर मराठीतील काही बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चला तर बघूया या आठवड्यात कोणते चित्रपट रिलीज होणार आहेत…
मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘रावरंभा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचे काही बिग बजेट चित्रपट रिलीज झाल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. अखेर हा चित्रपट उद्या म्हणजेच २६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.'रावरंभा'चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राव आणि रंभा यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. इतिहासाच्या पानांमध्ये‘रावरंभा’ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही,तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. हा चित्रपट बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे.
शालेय किंवा कॉलेज जीवनात एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असतं. पण काही ना काही कारणानं ते प्रेम यशस्वी होत नाही. या पहिल्या प्रेमाची पुन्हा आठवण करून देण्याचा प्रयत्न‘गेट टुगेदर’या चित्रपटात करण्यात आला आहे.‘देवमाणूस’या गाजलेल्या मालिकेतील एकनाथ गिते, ‘अॅटमगिरी’, ‘वाघेऱ्या’अशा चित्रपटात काम केलेली श्रेया पासलकर, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’या मालिकेतील त्रिशा कमलाकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. हा बहुचर्चित चित्रपट २६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'जोगिरा सारा रा रा'हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. लग्न म्हणजे छळ आहे,हा छळ टाळण्यासाठी काय करता येईल?अशी चित्रपटाची वन-लाइन स्टोरी आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नेहा शर्मा हे यात प्रमुख भूमिकेत आहेत. येत्या २५ मे रोजी हा प्रदर्शित होतोय. संजय मिश्रा यात सहाय्यक भूमिकेत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन कुशन नंदी यांनी केलं आहे.